पणन महासंघाने नाफेडच्या खरेदीची मुदत वाढवून ३१ जानेवारीपर्यंत केली आहे. त्यामुळे उरलेल्या १३ दिवसात १५ हजार ९८९ शेतकऱ्यांच्या सोयाबीनची मोजणी नाफेड करु शकेल की पुन्हा मुदतवाढ मिळेल याकडे नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
वाशिम जिल्ह्यात 'नाफेड'च्या (Nafed) सहा केंद्रांतर्गत हमीभावाने सोयाबीन खरेदी होत आहे. यासाठी १८ हजार ४०३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी केवळ २ हजार ४१४ शेतकऱ्यांकडील ६३ हजार १७१ क्विंटल सोयाबीनची मोजणी झाली आहे.
हमीभावाने सोयाबीन (Soybean) खरेदी प्रक्रियेत विविध अडचणी आल्याने शासनाने सुरुवातीला १२ जानेवारीपर्यंत मुदत वाढवून दिली. त्याच वेळी नोंदणीसाठीही मुदत वाढविण्यात आली होती. त्यामुळे नाफेडकडे सोयाबीन विकण्यास इच्छुक शेतकऱ्यांची संख्या वाढून १८ हजार ४०३ वर पोहोचली.
शासनाने खरेदीची मुदत वाढवून दिल्यानंतरही १५ जानेवारीपर्यंत एकूण २ हजार ४१४ शेतकऱ्यांच्या ६३ हजार १७१ क्विंटल सोयाबीनचीच मोजणी होऊ शकली.
अद्यापही १५ दिवसांत हजार ९८९ शेतकऱ्यांच्या सोयाबीनची मोजणी प्रलंबितच आहे. त्यामुळे येत्या १३ दिवसांत या शेतकऱ्यांचे सोयाबीन मोजण्याचे आव्हान नाफेडसमोर राहणार आहे. त्याशिवाय व्हीसीएमएसच्या ६ केंद्रातही हजारो शेतकऱ्यांच्या सोयाबीनची मोजणी प्रलंबीत आहे. ही मोजणीही १३ दिवसात करावी लागेल.
नाफेडच्या सोयाबीन खरेदीची स्थिती
गाव | नोंदणी केलेले शेतकरी |
राजगाव | ६५५९ |
मालेगाव | ४२९८ |
रिसोड | ४०५० |
अनसिंग | १२५७ |
मानोरा | १८८० |
देगाव | ३५९ |
खरेदी झालेले
राजगाव | १२९४ |
अनसिंग | २८९ |
रिसोड | ४९३ |
मालेगाव | २५८ |
मानोरा | १८० |
देगाव | 00 |
मोजलेल्या सोयाबीनपैकी १६,२०० क्विंटल केंद्रातच
जिल्ह्यात नाफेडच्या सहा केंद्रांमध्ये १५ जानेवारीपर्यंत २४१४ शेतकऱ्यांचे ६३ हजार १७१ क्विंटल सोयाबीन मोजण्यात आले आहे. त्यामधील ४६ हजार २१७ क्विंटल सोयाबीन वेअर हाऊसमध्ये साठविण्यात आले, तर १६ हजार १२९ क्विंटल सोयाबीन केंद्रातच पडून आहे.
'व्हीसीएमएस'कडेही हजारो शेतकऱ्यांचे सोयाबीन
नाफेड अंतर्गत सहा आणि व्हीसीएमएस अंतर्गतही सहा केंद्रात हमीभावाने सोयाबीन खरेदी होत आहे. नाफेडकडे १६ हजार शेतकरी मोजणीच्या प्रतिक्षेत असताना व्हीसीएमएसकडेही हजारो शेतकऱ्यांच्या सोयाबीनची मोजणी प्रलंबित आहे. या केंद्रातही येत्या १३ दिवसांतच शेतकऱ्यांच्या सोयाबीनची मोजणी करावी लागणार आहे.
हे ही वाचा सविस्तर : Cotton Market : लाखोंची गुंतवणूक करूनही पांढऱ्या सोन्याला काजळी