Nafed :
लातूर :सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून 'नाफेड'च्या वतीने खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र, सव्वा महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात केवळ ६ हजार ६४० क्विंटल सोयाबीन खरेदी झाली आहे. दरम्यान, सोयाबीन विक्रीच्या नोंदणीसाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून ती ३० नोव्हेंबरपर्यंत आहे.
यंदा वेळेवर पाऊस झाल्याने खरिपात सोयाबीनचा ४ लाख ९० हजार ९०६ हेक्टरवर झाला. पुरेसा पाऊस झाल्याने पीकही चांगले बहरले. मात्र, परतीचा पाऊस झाल्याने पिकाचे नुकसान झाले.
अडचणीमुळे काही शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री करण्यास सुरुवात केली; परंतु बाजारपेठेत क्विंटलमागे हमीभावापेक्षा जवळपास ५०० ते ६०० रुपये कमी मिळू लागले.
सव्वातीन कोटी रुपयांची खरेदी...
• सोयाबीन विक्रीसाठी आतापर्यंत जिल्ह्यातील १८ हजार १८८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी ३ हजार ५२६ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आला.
• त्यातील ३७९ शेतकऱ्यांनी ६ हजार ६४० क्विंटल सोयाबीन विक्री केली आहे. ती ३ कोटी २४ लाख ८५ हजार २३६ रुपयांची आहे.
ओलावा, सणांमुळे गती नाही...
• नाफेडच्या वतीने जिल्ह्यात १० ऑक्टोबरपासून हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत ३७९ शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केली आहे.
• सोयाबीनमध्ये ओलावा अधिक असल्याने खरेदीसाठी अडचण येत आहे. तसेच दीपावली सणामुळे शेतकऱ्यांचा ओढा कमी झाला होता. आता गती येईल, असे सांगण्यात आले.
महिनाअखेरपर्यंत करता येणार नोंदणी...
'नाफेड'च्या वतीने सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. आतापर्यंत १८ हजार १८८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. दरम्यान, १५ नोव्हेंबर रोजी नोंदणीची मुदत संपली होती. अधिकाधिक शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळावा म्हणून नोंदणी प्रक्रियेची मुदत वाढविण्यात आली आहे. आता ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करून लाभ घ्यावा. - विलास सोमारे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.
१८ हजार शेतकऱ्यांची आतापर्यंत नोंदणी...
तालुका | नोंदणी |
लातूर | ३१४२ |
चाकूर | २०४७ |
औसा | १३०२ |
रेणापूर | २३६५ |
उदगीर | ४४५७ |
देवणी | ५६९ |
अहमदपूर | १२१६ |
निलंगा | २०६४ |
जळकोट | १०२६ |
एकूण | १८९८८ |