Nafed Market :
यवतमाळ : जिल्ह्यात नाफेडचे हमी केंद्र मृगजळ ठरले आहे. अधिक ओलावा असल्याच्या कारणावरून या केंद्रांनी सोयाबीनची खरेदीच थांबविली आहे. दुसरीकडे याच स्थितीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू केली आहे.
२९ ऑक्टोबर रोजी कळंब बाजार समितीत २ हजार २०० रुपये क्विंटल दराने शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यात आले. याचा व्हिडीओ शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.
केंद्र शासनाने सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये क्विंटलचा हमी दर जाहीर केला आहे. किमान हमी केंद्रात सोयाबीनची खरेदी झाली, तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.
मात्र, शेतकऱ्यांचे बाजारात येणारे सोयाबीन ओलसर असल्याने व्यापारी मन मानेल तशा कमी दरात सोयाबीन खरेदी करीत आहेत.हे दर हमी दराच्याही निम्मेच आहेत.
विदर्भातील सोयाबीन खरेदी केंद्र नावालाच उघडले आहे. मात्र, या ठिकाणी किती सोयाबीन खरेदी झाले याच्या नोंदी तूर्त अधिकाऱ्यांकडे नाही. कळंब तालुक्यातील कात्री येथील शेतकरी प्रतीक भुजाडे यांनी २९ ऑक्टोबर रोजी कळंब बाजार समितीत सहा क्विंटल ५५ किलो आणि ५ क्विंटल ९८ किलो, असे दोन ढीग सोयाबीन विक्रीसाठी आणले होते. यातील एका ढिगाला २ हजार २०० रुपये, तर दुसऱ्या ढिगाला ३ हजार ६२५ रुपये क्विंटलचा दर मिळाला.
• हमी केंद्र केवळ नावालाच आहे. हमीदरात नाफेडकडून सोयाबीनची खरेदी व्हायला हवी. किमान बाजार समित्या हमीदरात तारणावर सोयाबीन ठेवेल, अशी व्यवस्था सरकारने करावी. यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल.
• संपूर्ण विदर्भात १ लाख १९ हजार ६७३ शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीकरिता हमी केंद्राकडे नोंद केली. प्रत्यक्षात ३७४ शेतकऱ्यांचे ६०३८ क्विंटल सोयबीन खरेदी झाले. यावरून हमी केंद्रातील सोयाबीनची गती किती मंद आहे याचा अंदाज येतो.
शेतकऱ्यांच्या शेतमालास चांगले दर मिळाले, तरच हमीदराचा फायदा होणार आहे. प्रत्यक्षात सोयाबीनला २ हजार २०० रुपयांचा दर शेतकऱ्यांना मिळाला. दिवाळीचा बाजार असल्याने पडलेल्या दरात सोयाबीन विकावे लागले. - प्रतीक भुजाडे, शेतकरी, कात्री, ता. कळंब