Join us

Nafed Onion: ‘नाफेड’च्या अध्यक्षांकडून कांदा खरेदी केंद्रांवर अचानक पाहणी; अनेक दोष आढळले

By दिनेश पाठक | Published: June 21, 2024 2:28 PM

Nafed Onion Procurement: खासगी दौऱ्याचे कारण सांगून पंचनामा; अधिकाऱ्यांकडून सारवासारव. नाफेडच्या अध्यक्षांनी अचानक पाहणी केल्यानंतर कांदा खरेदीतील गैरप्रकार चव्हाट्यावर आले आहेत.

अधिकारी व व्यापारी यांची साखळी तयार होऊन नाफेडच्या (Nafed Onion Procurement) माध्यमातून शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक तसेच ‘नाफेड’शिवाय ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी फिरविलेली पाठ याचा पंचनामा नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहीर यांनी केला. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील नाफेडच्या कांदा खरेदी-विक्री केंद्रांवर अचानक पाहणी केली. या पाहणीत त्यांना अनेक दोष आढळून आले.

अध्यक्षांकडून कांदा खरेदी केंद्रांची पाहणी होत असल्याची भनक नाफेडशिवाय कृषी अधिकाऱ्यांनाही लागली नाही. प्राप्त माहितीनुसार खासगी दौऱ्याचे कारण सांगून नाफेड अध्यक्ष नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले होते. देवळा येथील नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रावर अध्यक्ष जेठाभाई अहीर शुक्रवारी (दि.२०) सकाळी अकरा वाजता पोहोचले. ग्रामीण भागातील एका केंद्रावरही ते पोहोचले.

अध्यक्षच अचानक आल्याने तेथे उपस्थित नाफेडच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. आतापर्यंत खरेदी केलेल्या कांद्याचा हिशेब अध्यक्षांनी तपासला. तसेच शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी का झाला? म्हणून अधिकाऱ्यांनाही जाब विचारले. तेथील अधिकाऱ्यांनी बाजार समितीपेक्षा आपल्याकडे कांद्याला भावच कमी असल्याचे सांगून नामनिराळे राहण्याचा प्रयत्न केला. कांदा प्रश्नांबाबतीत तक्रार करण्यात आली होती त्यामुळे अध्यक्षांनी कोणासही काही न सांगता आपला चौकशी दौरा केला.चौकशीत काय आढळले- शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी न करता बाजार समितीतून कांदा खरेदी केला जात हाेता- ऑनलाईन कांदा खरेदी विक्रीमध्ये घोटाळा आहे का? याचे बारकावे अध्यक्षांनी तपासले.- विक्री केलेल्या मालापेक्षा दुप्पट कांदा गोडावूनमध्ये आढळून आला.- ५ ते ६ खरेदी खरेदी केंद्रांवर चुकीच्या पध्दतीने काम सुरू असल्याचे दिसले- आधारकार्डवर शिक्के मारुन ऑनलाइन खरेदी विक्री व्यवहारात गडबडीचा संशय- कांदा खरेदी विक्री व्यवहारात दलाली होत असल्याचा अध्यक्षांना संशय

काय म्हणाले नाफेडचे अध्यक्षशेतकऱ्यांना दुप्पट नफा देण्यासाठी नाफेडची स्थापना करण्यात आली आहे. आता राेजचे भाव देणे सुरू केले असून भावात रोजच वाढ होत आहे. काही गोष्टी घडायला नको ते देखील चाैकशीत आढळून आले आहे. कांदा खरेदी विक्री व्यवहारात दलाली होत असल्याने शेतकऱ्यांना पूर्ण पैसे मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे. बाजार समितीतून कांदा माल खरेदी करणे अवघड आहे पण आम्ही, याबाबतीत विचार करत असल्याचे नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहीर म्हणाले.

अध्यक्षांनी पाहणी करताच भावात उच्चांकनाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहीर यांनी नाशिक जिल्ह्यातील नाफेडच्या कांदा खरेदी विक्री केंद्रांवर अचानक पाहणी करताच शुक्रवारचे (दि.२१) कांद्याचे दर नाफेडच्या केंद्रांवर थेट ३०७४ पर्यंत गेले. हा यंदाचा भावाचा उच्चांक आहे. पहिल्या दिवसापेक्षा २०० रूपयांची भाववाढ झाली. केंद्र सरकारच्या बफरस्टॉकसाठी शेतकऱ्यांकून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे दर यापूर्वी नाफेडच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून ठरवले जात होते. मात्र, आता नाफेड कांदा खरेदीचे दर दिल्लीतून ठरणार आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांचा फायदा होणार असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्याचा इफेक्ट शुक्रवारच्या भावात दिसून आला खरी, मात्र तरीही बाजार समितीपेक्षा २०० रूपये भाव नाफेडचा कमीच आला. दोघाकडील भाव लवकरच समान होतील, असा विश्वास अध्यक्षांनी व्यक्त केला.

टॅग्स :कांदा