जून-जुलै दरम्यान नाफेड आणि एनसीसीएफने खरेदी करून साठवलेल्या रबी हंगामातील उन्हाळी कांदा भाव वाढल्याने ग्राहकांपर्यंत स्वस्त दरात देण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून सध्या नाशिक परिसरातून नियमित रेल्वेने हा कांदा दिल्लीसह राज्यातील महत्त्वाच्या शहरात पोहोचविला जात आहे.
असे असले तरी शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडचाही उन्हाळी कांदा जवळपास संपला असून शिलकीत असलेल्या १ ते २ टक्के कांद्याची निर्यात होताना दिसत आहे. उन्हाळी कांदा ४ महिन्यांपेक्षा जास्त साठवला तर खराब होतो, तसा अनेक ठिकाणी हा कांदा खराब होऊन वायाही गेला आहे. मात्र नाफेड आणि एनसीसीएफने मूल्य स्थिरीकरण योजनेअंतर्गत काही शेतकरी उत्पादनक कंपन्या आणि सहकारी सोसायट्या यांच्या माध्यमातून खरेदी केलेला व सध्या संबंधित एफपीओंच्या चाळीत असलेला उन्हाळी कांदा सहा महिने उलटूनही खराब झालेला नसून उलट या कांद्याचे रुपांतर खरीप आणि लेट खरीपाच्या लाल कांद्यात झाल्याचे पाहायला मिळत आहे.
परिणामी साठवून खराब झालेला उन्हाळी कांदा बाजारात पाठविण्याची नाफेड आणि एनसीसीएफची नामुष्की टळली असून त्याऐवजी हा चमत्कारी ताजा लाल कांदा ग्राहकांना मिळत आहे. दुसरीकडे नाशिकच्या कांदा पट्ट्यात साठवलेल्या रबीचा कांदा सहा महिन्यानंतर खरीपात कसा बदलला, या चमत्काराची चर्चा सुरू आहे. मात्र नाफेड आणि एनसीसीएफच्या भ्रष्ट अधिकारी, पदाधिकारी आणि काही शेतकरी विघातक शेतकरी उत्पादक कंपन्यांची आपल्याकडील कौशल्य वापरून हा चमत्कार घडविला असल्याचे वास्तव उजेडात येत आहे.
मूल्य स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफने यंदा सुमारे ४.७० लाख मे. टन उन्हाळी कांदा खरेदी केला. ग्राहक संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आजतागायत त्यातील दीड लाख मे. टन कांदा बाजारात ग्राहकांपर्यंत पाठविण्यात आला असून अजून सुमारे साडेतीन लाख टन कांदा पाठवणे बाकी आहे. दरम्यान बाजारातील कांद्याचे बाजारभाव अजूनही चढे असल्याने ग्राहकांसाठी नाफेड आणि एनसीसीएफने साठविलेल्या रबी किंवा उन्हाळी कांद्याचा साठा आता बाजारात पाठवणे सुरू केले आहे. पण मागील काही दिवसांपासून खरेदी केलेल्या मूळ उन्हाळी कांद्याऐवजी खरीपाचा ताजा आणि नाशवंत होणारा सुमार दर्जाचा लाल कांदा बाजारात पाठवला जात आहे. त्याला संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आणि नाफेडच्या काही कर्मचाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे.
उन्हाळी कांदा बदलला तो चमत्कार काय आहे?नाफेड आणि एनसीसीएफशी संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्यांनी नाफेड आणि एनसीसीएफच्या अधिकारी, पदाधिकारी यांच्याशी संगनमत करून यंदा उन्हाळी कांद्याची खरेदी प्रत्यक्षात केलीच नाही किंवा काहींनी निर्धारित साठवण व खरेदीच्या केवळ २५ ते ५० टक्के खरेदी केली, त्यातील काही कांदा मध्यंतरी नाफेडला दिला, व काही भाव वाढल्यावर खुल्याबाजारात विकून बक्कळ नफा कमावला. यंदा हा भ्रष्ट्राचार विविध माध्यमातून चव्हाट्यावर आल्यावर ग्राहक संरक्षण मंत्रालयाने त्याची गंभीर दखल घेऊन कारवाई सुरू केली, तसेच जेवढ्या कांद्याचे पैसे कंपन्यांना अदा केले, तितका कांदा परत करण्याचे आदेशही दिले. इतकेच नव्हे, तर मागच्या आठवड्यात ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे काही वरिष्ठ अधिकाऱ्याचे पथक या कांदा वसुलीसाठी नाशिकमध्ये येऊन गेले. त्यांनी संबंधिताना १५ दिवसांची मुदत कांदा परत करण्यासाठी दिली असल्याचे समजते. भ्रष्टाचारात गुंतलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी हा कांदा परत न केल्यास त्यांच्यावर गु्न्हे नोंदविण्यात येणार असल्याच्या नोटीसाही बजावण्यात आल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. या प्रकाराने हादरलेल्या संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आता खुल्या बाजारातून कमी किंमतीत लाल कांदा खरेदी करायला सुरूवात केली असून सध्या नाफेड आणि एनसीसीएफला कराराप्रमाणे रब्बीचा नव्हे, तर खरीपाचा लाल आणि नाशवंत कांदा परतावा म्हणून दिला जात आहे. हा प्रकार म्हणजे नाफेड आणि एनसीसीएफशी केलेल्या कराराचा भंग असला, तरी यावर नाफेड आणि एनसीसीएफच्या भ्रष्ट पदाधिकाऱ्यांची मूक संमती आणि पाठिंबा असल्याने सध्या त्याची चर्चा दाबून टाकण्याकडेच संबंधितांचा कल दिसत आहे. यावर आता केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालय काय कारवाई करते याकडे सामान्य ग्राहक आणि शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
नाफेडच्या अधिकाऱ्याचे निलंबनखरेदी न केलेल्या कांद्याचे पैसे संबंधित भ्रष्ट्र शेतकरी उत्पादक कंपन्यांना अदा केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने नाशिक येथील नाफेडच्या व्यवस्थापकाला निलंबीत करण्यात आले आहे. हा प्रकार ऐन निवडणुकीच्या काळात घडल्याने तो चव्हाट्यावर आला, तर सत्ताधारी पक्षाला त्याचा फटका बसेल म्हणून तो सरकारमधील काही धुरिणांनीच पद्धतशीरपणे दाबल्याचे समजते. असे असले तरी सध्या दिल्लीच्या ग्राहकांना कमी किंमतीत नाफेडचा खराब झालेला लाल कांदा विकत घ्यावा लागत असल्याचे प्रकारही समोर आले असून तेथील ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.