Join us

Nafed Onion Scam: नाशिकच्या महेशरावांनी घेतले २१८ एकरवर उन्हाळी कांद्याचे उत्पादन, नाफेडच्या शेतकऱ्याची अनोखी यशकथा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 5:05 PM

Nafed Onion Scam: आपल्या शेतात पिकवलेला सर्वच्या सर्व कांदा नाफेडला देणारे मोठे शेतकरी नाशिक जिल्हयात अनेक असल्याचे नाफेडच्या व्हायरल शेतकरी यादीतून दिसून आले असून दोनशे एकरावर कांदा लागवड करणारे महेशराव त्यापैकीच एक आहेत. जाणून घेऊ या त्यांची अनोखी ‘नाफेड कथा’.

Nafed Onion Scam: जिद्द, मेहनत, चिकाटी आणि अंगात कुठल्याही कायद्याला न घाबरण्याची वृत्ती असेल, तर एकटा शेतकरी शेकडो एकरमध्ये पीक उत्पादन करून स्वत:चा वेगळा ‘ठसा’ कसा उमटवू शकतो, याचे उत्तम उदाहरण महेशरावांनी आपल्या कांदाशेतीतून समाजापुढे ठेवले आहे. यंदाच्या उन्हाळी कांदा हंगामात त्यांनी पाच-दहा नव्हे, तर तब्बल ८८.५० हेक्टर, अर्थात २१८ एकरवर कांदा लागवड करून केवळ नाशिकच नव्हे, तर संपूर्ण भारतातील कांदा शेतीत नवाच विक्रम प्रस्थापित केला आहे. महेशराव हे नाशिक जिल्ह्यातील बहुतेक कसमादे पट्ट्यातील शेतकरी आहेत.

नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्टा हा कांद्यासाठी ओळखला जातो. ‘लोकमत ॲग्रो’चे वाचक असलेल्या काही प्रगतीशील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देवळा, सटाणा परिसरात १० ते २० एकरवर कांदा लागवड करणारे मोठे शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच असली, तरी कांदा उत्पादनातील त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. असे असले तरी १५ एकर किंवा २० एकर जमीन मात्र त्यांच्या एकट्याच्या मालकीची नसून सामाईक मालकीची आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सख्खे भाऊ किंवा भाऊबंद एकत्र येऊन मोठ्या प्रक्षेत्रावर कांदा लागवड करतात. परिसरात त्यांची ओळख प्रगतीशील शेतकऱ्याची आहे.

कदाचित कसमादे भागातील असलेल्या आणि सुमारे २१८ एकरवर कांदा घेणाऱ्या महेशरावांची मात्र गोष्टच निराळी. याचे कारण म्हणजे यंदा त्यांनी आपला उत्पादित झालेला सर्वच्या सर्व कांदा नाफेडला दिला आहे. त्यामुळेही त्यांचे कांद्याचे क्षेत्रफळ वाढले असावे. कारण एफपीओंच्या माध्यमातून नाफेडला कांदा विकणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी ७/१२ उताऱ्यावरील नोंदींपेक्षा  दुप्पट किंवा तिप्पट वाढते, असा अप्रत्यक्ष संदेश नाफेडच्याच व्हायरल होत असलेल्या यादीने शेतकऱ्यांना दिला आहे. या यादीतील माहिती कदाचित महेशरावांसारख्या ‘बड्या’ शेतकऱ्यांना आधीच कळाली असू शकते.  म्हणूनच त्यांनी नाफेडला कांदा देण्याचा निर्णय घेतला असावा आणि त्यातून त्यांची जमिनही वाढली असणार. 

नाफेडच्या यादीतील महेशरावांची कांदा विक्री नोंद

कांद्यातून मिळवले एक कोटीपेक्षा जास्त उत्पन्ननाफेडच्याच अंतर्गत येणाऱ्या चितेगाव येथील राष्ट्रीय बागवानी संशोधन केंद्रातील कांदा संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याचे उत्पादन हेक्टरी ३० ते ४० टन इतके असते. त्या हिशेबाने एकट्या महेशरावांना हेक्टरी सरासरी ३० टन उत्पादकेनुसार  सुमारे ६ हजार ५४० टन कांदा उत्पादन झाले असावे. हे उत्पादन म्हणजे लासलगाव आणि पिंपळगाव या देशातल्या सर्वात मोठ्या कांदा बाजारसमित्यांतील सरासरी दैनिक आवकेच्या जवळपास असल्याचे पणन मंडळातील बाजार माहितीनुसार लक्षात येते.  

असे असले तरी नाफेडच्या पिंपळगाव बसवंत येथील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा एका शेतकऱ्याला हेक्टरी २५.२ टन कांदा नाफेडला विकण्याची मर्यादा घालून देण्यात आली आहे. या निकषानुसार महेशरावांनी १४ जुलै रोजी नाफेडला २५.२ गुणिले २१८ म्हणजेच सुमारे ५४५० टन कांदा विक्री केली असावी. त्यातून त्यांना सरासरी २७०० रुपये प्रति क्विंटल दराने सुमारे १ कोटी ४७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असावे. समजा भाव जरी कमी अधिक असला, तरी महेशराव हे एकाच दिवशी कांद्यातून करोडपती होणारे शेतकरी ठरल्याने त्यांची ही अनोखी ‘नाफेड कांदा यशकथा’ सध्या राज्यातील कांदा उत्पादकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.असेही ‘प्रगतीशील’ शेतकरीमहेशरावांप्रमाणेच नाशिक जिल्ह्यातले दुसरे मोठे शेतकरी म्हणजे केशवराव. त्यांनी यंदा ३९.४० हेक्टरवर म्हणजेच ९७ एकरवर त उन्हाळी कांदा पिकवला आणि  ७ जुलै रोजी त्या कांद्याची नाफेडला विक्री केली. महिला शेतकऱ्यांच्या दृष्टीने कौतुकाची बाब म्हणजे नाशिक जिल्ह्यातीलच  पुनमताई नावाच्या शेतकरी महिलेने यंदा  २५ हेक्टरवर उन्हाळी कांदा लागवड केली आहे. म्हणजेच सुमारे ६१ एकरवर त्यांनी कांदा लागवड केली आहे. त्यांनीही आपला कांदा नाफेडला ६ जून २४ रोजी विक्री केला आहे. याशिवाय नाशिकच्या रमेश रावांनी १५ हेक्टरवर कांदा लागवड केली आहे. म्हणजेच तब्बल ३७ एकरवर त्यांनी यंदा उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेतले आहे. याशिवाय ७ हेक्टर (सुमारे १७ एकर) पासून १५ हेक्टर पर्यंत कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही नाशिक जिल्ह्यात लक्षणीय असून हे सर्व शेतकरी नाफेडला एफपीओ मार्फत कांदा विक्री करत असल्याचे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या यादीतून समोर आले आहे. 

केशव रावांची कांदा विक्री नोंद

हे सर्व शेतकरी इतक्या मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड करून प्रगत झाले आहे, याचे कारण म्हणजे त्यांच्यात असलेली शेतीची जिद्द, चिकाटी, हिंमत हे गुण आहेतच, पण राज्यातील इतर कांदा उत्पादकांमध्ये नसलेला आणखी एक गुण त्यांच्यात आहे, तो म्हणजे लोकशाही यंत्रणेला आणि कुठल्याही कायद्याला न घाबण्याची वृत्ती. राजकीय पाठबळ मिळालेल्या एफपीओ आणि आणि नाफेडची घोटाळाबाज यंत्रणा यांच्यामुळे त्यांना हा गुण प्राप्त झाला आणि त्यातून त्यांनी प्रगती केली. असं म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एक स्त्री असते. महेशराव आणि रमेशराव आणि केशवरावांच्या यशामागे मात्र नाफेडचे भ्रष्ट अधिकारी आणि एफपीओंचे संचालक ही यंत्रणा असली पाहिजे असे नाशिकमधल्या कांदा उत्पादकांना वाटतेय.

व्हायरल यादी बनावट नाहीज्या शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली नाही, त्यांच्या खात्यावर नाफेडचे पैसे जमा झाले होते. त्याबाबत तक्रारी आल्यानंतर आम्ही  पाठपुरावा करून नाफेडकडून शेतकऱ्यांची कांदा खरेदीची यादी मिळवली होती. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली यादी ही बनावट नसून आम्हाला मिळालेल्या यादीशी मिळती-जुळती आहे.-गणेश निंबाळकर, जिल्हा प्रमुख, प्रहार संघटना आणि संचालक, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती

टॅग्स :कांदाबाजारशेतीशेती क्षेत्र