नाफेडच्या कांदा खरेदी दरात वारंवार बदल होत असून आता नव्याने जिल्ह्याप्रमाणे कांदा दर ठरविण्यात येत आहेत. मात्र बाजारभावापेक्षा हे दर कमी असून यापुढे शेतकऱ्यांनी आपला कांदा नाफेडला देऊच नये अशी भूमिका घेतली असल्याचे निवेदन महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने घेतली आहे.
त्यासंदर्भात त्यांनी एक प्रसिद्ध पत्रक जारी केले आहे. त्यात म्हटलेय की केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत तब्बल 5 (पाच) लाख टन कांद्याचा बफर स्टॉक करण्यासाठी चार महिन्यांपूर्वी दिल्लीतील अधिकाऱ्यांनी नाशिक येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांकडून हा कांदा घेतला जाईल अशी घोषणा केली होती. प्रत्यक्षात लोकसभा निवडणूक होऊन गेली तरीही नाफेड व एनसीसीएफची कांदा खरेदी सुरू झाली नाही.
जेव्हा नाफेड व एनसीसीएफची कांदा खरेदी सुरू झाली, तेव्हा सुरुवातीला प्रती क्विंटल 2000 पेक्षाही कमी तर नंतर 2105 तर त्यानंतर 2555 या दराने नाफेड व एनसीसीएफने कांदा खरेदी सुरू केली. परंतु शेतकऱ्यांना आपल्या कांद्याला बाजार समित्यांमध्ये लिलावात नाफेड व एनसीसीएफच्या कांदा खरेदीच्या दरापेक्षा अधिकचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड व एनसीसीएफला कांदा न देण्याची भूमिका घेतली होती.
सुरुवातीला नाफेड व एनसीसीएफचे स्थानिक पातळीवरील कांदा खरेदीचे दर ठरवण्याचे अधिकार गोठवले असे सांगून दिल्लीतील ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून हे नाफेडचे प्रत्येक आठवड्याचे दर जाहीर करण्याचा नवीन निर्णय यावर्षी घेण्यात आला. परंतु दिल्लीतूनही ठरलेले नाफेडसाठीचे कांदा खरेदीचे दर बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कांद्याच्या दरापेक्षा कमीच असल्याने शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकार बद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.
आता पुन्हा आज 20 जून पासून नाफेड व एनसीसीएफला बफर स्टॉकसाठीच्या कांदा खरेदीचे दर दिल्लीतील ग्राहक व्यवहार मंत्रालय कडून ठरव्याऐवजी स्थानिक अधिकारीच हा दर ठरवणार असून आज 20 जून 2024 चा शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांना नाफेड एनसीसीएफच्या कांदा खरेदीसाठीचा प्रतिक्विंटलचा दर जिल्ह्यानुसार पुढील प्रमाणे आहेत. अहमदनगर (अहिल्यानगर) 2357 रु बीड 2357 रु नाशिक 2893 रु धुळे 2610 रु छत्रपती संभाजीनगर 2467 रु धाराशिव 2800 रु सोलापूर 2987 रु पुणे 2760 रु.
दरम्यान नाफेडच्या आजच्या जाहीर दरापेक्षा नाशिक बाजारसमित्यांमधील कांदा दर हे जास्त असून सध्या बाजारात ३२०० रुपयांपर्यंत सरासरी दर मिळत असल्याचेही कांदा उत्पादक संघटनेने सांगितले आहे.
यावर्षी केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून बफर स्टॉकसाठी पाच लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्टे ठेवले होते परंतु ज्या वेळेस बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल दर मिळत होते त्यावेळेस नाफेड व एनसीसीएफने शेतकऱ्यांकडून हा कांदा किमान साडेतीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करणे आवश्यक होते. आता शेतकऱ्यांना बाजार समित्यांमध्ये सरकारच्या कांदा खरेदीच्या दरापेक्षा अधिकच दर मिळत असल्याने नाफेड व एनसीसीएफसाठी कांदा खरेदी करणाऱ्या फार्मर प्रोडूसर कंपन्यांना शेतकऱ्यांनी आपला कांदा देऊ नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे.
भारत दिघोळे, अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.