ओतूर : नवरात्रीचा उत्साह सर्वत्र दिसून येत असून, गावोगावी दुर्गामातेची प्रतिष्ठापना करून देवीचा जागर करण्यात येत आहे. नवरात्रीत महिला उपवास करत असल्याने उपवासासाठी लागणारी केळी, पेरू, चिकू, रताळी मोठी यांना मागणी वाढली आहे. दरम्यान, देवीच्या आरतीसाठी व दैनंदिन पूजेसाठी हार, फुले लागत असल्याने झेंडू, गलांडा, मोगरा, चाफ्याच्या फुलांची मोठी विक्री होत आहे.
झेंडूच्या फुलांना विशेष मागणी आहे. सध्या कोलकाता झेंडू ५० ते ६० रुपये किलोने झेंडूची विक्री होत आहे. हा दर दसऱ्यापर्यंत आणखी काही प्रमाणात वाढेल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सध्या ओतूर शहरासह गावोगावी दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दिवसरात्र देवीचा जागर सुरू आहे. पूजाअर्चा, आरती, होमहवन सुरू आहेत. नवरात्रीत महिला वर्गाने उपवास केले आहेत. उपवासासाठी लागणाऱ्या फळांची भाजी मार्केटमध्ये मोठी उलाढाल आहे. केळी, रताळी, पेरू, चिकू यासह सफरचंद या फळांची विक्री चांगल्या पद्धतीने होत आहे, असे विक्रेते सांगतात. रहदारीच्या मुख्य रस्त्याकडेला, प्रमुख चौकात टेम्पो व अॅपेरिक्षातून फळविक्री केली जात आहे.
फूलशेती ठरतेय फायदेशीर
नवरात्र, विजयादशमी दसऱ्याला घरांची, वाहनांची, शस्त्रांची, अवजारांची, दुकानांची पूजा केली जात असल्याने झेंडूंच्या फुलांची मोठी उलाढाल होत असते. यानंतर दिवाळी सुरू होते. यातही झेंडूंच्या फुलांना मागणी असते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांचे प्लॉट घेतले आहेत. तीन महिन्यांचे व हमखास नफा मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी सणासुदीच्या दिवसात फूलशेतीला प्राधान्य देताना दिसत आहे.
केळी ६० तर पेरू, रताळी ८० रुपये किलो
केळी ५० ते ६० रुपये डझनप्रमाणे विकली जात आहेत. पेरू, रताळी ८० रुपये किलो, चिकूंनाही मोठी मागणी असून ६० रुपये किलोने विक्री सुरु आहे. सफरचंद १२० रुपये किलो आहेत. मोसंबी १०० रुपये तर संत्रा ८० रुपये किलोने विक्री होत आहे. सीताफळ ५० रुपये किलो भाव असल्याचे अक्षय डुंबरे यांनी सांगितले.