गोंदिया : नवरात्रोत्सवात नऊ दिवस भाविक मोठ्या भक्तिभावाने उपवास करतात. उपवासाच्या पदार्थांना मागणी कायम असते. त्या पार्श्वभूमीवर बाजारात शेंगदाणे, साबुदाणा, भगरीची आवक मोठ्या प्रमाणात होते; मात्र यंदा साबुदाण्याचे दर स्थिर असून, शेंगदाणा आणि भगरीचे भाव किलोमागे चार ते सात रुपयांनी वाढले आहेत. ऐन उत्सवाच्या काळात ही दरवाढ झाल्याने भाविकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत उपवासाच्या पदार्थाचे दर वाढल्याने सामान्य नागरिकांना उपवास करणेही महागात पडणार आहे. त्यामुळे यंदा नवरात्रोत्सवातील उपवास आता सामान्यांच्या खिशाला भुर्दंड पाडणारा आहे. तरीसुद्धा भाविक उपवास करून नवरात्रोत्सव साजरा करणारच आहेत.
कोठून होते मालाची आवक?
■ भगर : तामिळनाडू, कर्नाटक आणि विदर्भाच्या काही भागांतून होते, तर पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमधील कच्च्या मालावर प्रक्रिया करून मार्केट यार्डात आवक होते.
■ साबुदाणा : तामिळनाडूतील सेलम जिल्ह्यातून, तर महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातून साबुदाण्याची आवक होते.
■ शेंगदाणा : कर्नाटक, गुजरात राज्यातून आवक होते, तसेच गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, कुरखेडा व देसाईगंज तालुक्यात भुईमूगाचे उत्पादन घेतले जाते.
नवरात्रोत्सवात आवक वाढते
■ नवरात्रोत्सवामुळे भगर, साबुदाणा, शेंगदाणे व अन्य साहित्याची मागणी वाढते. त्यामुळे व्यापायां- कडून दर वाढविले जातात. जिल्ह्यात नवरात्रोत्सवात मागणी जास्त असल्याने आवक वाढते.
■ जिल्ह्याच्या शहरी भागात साबुदाणा, शेंगदाण्याची आवक अधिक होते. ग्रामीण भागात मात्र जास्त प्रतिसाद मिळत नाही.
असे आहेत दर (प्रतिकिलो)
प्रकार | रुपये |
साबुदाणा | ८० |
भगर | १३० |
शेंगदाणे | १६० |
उत्सवात विविध पदार्थ तसेच साहित्याचे दर वाढविले जातात. यामुळे भाविकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. यंदाही काही प्रमाणात दर वाढलेले आहेत. याचा फटका सामान्य ग्राहकांना बसत आहे. उत्सवात तरी दर नियंत्रणात ठेवावेत, तेव्हाच दिलासा मिळेल. - रामेश्वरी पटले, गृहिणी.
राज्याच्या विविध भागांत पाऊस पडतच आहे. यामुळे बाजारातील आवकवर परिणाम झाला. आवक काही प्रमाणात घटली. त्यामुळे सध्या शेंगदाण्याचे दर तेजीत आहेत. दिवाळीत आवक वाढू शकते. नवीन माल बाजारात दाखल झाल्यानंतर दर घसरू शकतात. - बालचंद मुलचंदानी, व्यापारी.