Join us

नव्या लसणाची बाजारात आवक; कसा मिळतोय बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 10:39 AM

राजस्थानचा जामनगर येथील नव्या लसणाची बाजारात आवक झाल्याने चारशे रुपये प्रतिकिलो असलेल्या लसणाचे दर ३०० ते ३२० रुपये प्रतिकिलो झाले आहे. तर कोथिंबीर, मेथी, पालक आदी भाज्यांच्या दरात मोठी घट झाली आहे.

पिंपरी : लसणाच्या वाढत्या दरामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना बाजारात नव्या लसणाची आवक झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. लसणाचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत प्रतिकिलो ६० ते ८० रुपयांनी स्वस्त झाला आहे. तसेच मटार, राजमा आणि मिरचीची आवक घटल्याने दरात वाढ झाल्याची माहिती विक्रेते आबासाहेब रायकर यांनी दिली.

शहरातील मोशी उपबाजार, चिंचवड, आकुर्डी तसेच पिंपरी येथील लाल बहादुर शास्त्री भाजी मंडईमधील किरकोळ बाजारात मटार, राजमा आणि मिरचीच्या दरात २० ते २५ रुपयांनी वाढ होऊन भाव ७० ते ८० रुपये प्रतिकिलो झाला आहे.

तर राजस्थानचा जामनगर येथील नव्या लसणाची बाजारात आवक झाल्याने चारशे रुपये प्रतिकिलो असलेल्या लसणाचे दर ३०० ते ३२० रुपये प्रतिकिलो झाले आहे. तर कोथिंबीर, मेथी, पालक आदी भाज्यांच्या दरात मोठी घट झाली आहे. पालेभाज्यांच्या पेंडी प्रत्येकी १० रुपयेप्रमाणे विक्री होत आहे.

घाऊक दर (प्रतिकिलो)मटार ३५ ते ४०, राजमा ३५, मिरची ४०, लसूण २००, भेंडी ६५ ते ७०, गवार ७० ते ९०, गाजर २५ ते ३०, वांगी ५० ते ६०, शेवगा ७० ते ८०, काकडी १५ ते २०, कांदा १५ ते २०, बटाटा १२ ते १५, टोमॅटो १५ ते २०, आले ६५ ते ७० रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली.

मोशी उपबाजारातील आवक (क्विंटल)■ मटार ३३९, राजमा २००, मिरची १२९, लसूण २२, बटाटा ९८३, आले ३१, गाजर २०२, गवार ७, शेवगा २३, टोमॅटो ३९८, काकडी १८४, भेंडी ६० क्चिटल एवढी आवक झाली आहे.■ मोशी उपबाजारात पालेभाज्यांच्या एकूण ४५३०० गड्डी, फळे ७७० विचंटल आणि फळ भाज्यांची आवक ३८२० क्विंटल एवढी आवक झाली.

टॅग्स :बाजारमार्केट यार्डभाज्याशेतकरी