Join us

नवीन लसूण आला बाजारात, गावरान लसणासह हायब्रीड लसणाच्या किमतीही उतरल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 11:15 AM

लसणाच्या फोडणीचा खमंग दरवळ आता येऊ लागलाय घराघरातून..

दालफ्राय असो वा भाजी किंवा वरण फोडणीत लसूण टाकून झणझणीत तडका दिला जातो. तेव्हा त्याचा दरवळ सर्वत्र पसरतो अन् चवही खमंग लागते. मात्र, मागील काही महिन्यांत लसूण महाग झाल्याने चव गायब झाली होती. पण, आता नवीन लसूण बाजारात आल्यामुळे त्याचा दर कमी होतोय अन् फोडणीचा गायब झालेला दरवळही पुन्हा घरघरांतून येऊ लागला आहे.

भाजी चमचमीत होण्यासाठी फोडणी दिली जाते. त्यात तेल, मोहरी, जिरा, कडीपत्ता, मिरची, हिंगाचा वापर केला जातो. याशिवाय त्यात लसणाची भूमिकाही महत्त्वाची असते. लसणाशिवाय फोडणी अशक्य, आता खमंग पदार्थ खाणाऱ्या खवय्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे बाजारात नवीन लसणाची आवक वाढत आहे. यामुळे ६०० रुपये किलोने विक्री होणारा गावरान लसूण आता ४०० रुपयांना मिळू लागला आहे. हायब्रीड लसूनही ४०० रुपयांनी कमी होऊन २०० रुपये किलोने विकला जात आहे. भाव कमी झाल्याने भाजीमंडईत लसणाची मागणी वाढली आहे. भाजीखरेदीसाठी आलेला ग्राहक अर्धा किलो लसूण सहज खरेदी करीत आहे. औरंगपुरा भाजीमंडईत दिवसभरात दीड ते दोन क्विंटल लसणाची विक्री होत असल्याची माहिती विक्रेते संजय वाघमारे यांनी दिली.कुठून येतोय लसूण

सध्या बाजारात मध्य प्रदेशातून लसणाची आवक होत आहे. जाधववाडी परिसरातील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज १०५ ते १२५ क्विंटल लसणाची आवक होत आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकरीही काही प्रमाणात लसूण विक्रीला आणत आहे.पन्ह्यासाठी कैरी भाजीमंडईत

उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी थंडगार पन्हे पिले जाते. यासाठी कैऱ्या भाजीमंडईत येऊ लागल्या आहेत. जसजशी कैऱ्यांची आवक वाढत आहे, तसतसे भावही कमी होत आहे. • मागील महिन्यात १५० रुपये किलोने विक्री झालेली कैरी आता १०० रुपये किलोने ग्राहक खरेदी करीत आहेत. गूळ घालून कैरीचे पन्हे केले जाते, शिवाय बारीक फोडी करून इन्स्टंट लोणचेही केले जाते.

गूळ घालून केलेले लोणचे चवदार लागते. कृउबा समितीत दररोज ५० क्चिटल कैरीची आवक होत असल्याची माहिती विक्रेते सागर पुंड यांनी दिली.

टॅग्स :बाजारशेतकरीमार्केट यार्ड