विलास भेगडेतळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रमुख खाद्य असलेल्या तांदळाच्या मागणीत सणासुदीच्या काळात वाढ झाली आहे. मात्र, नवा तांदूळ बाजारात आल्यानंतर इंद्रायणी, कोलम तांदूळाच्या दरातही घट झाली आहे. आधीच्या दरापेक्षा हा तांदूळ आता पाच ते दहा रुपयांनी स्वस्त मिळत आहे.
सुगंधी वाण व चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या मावळच्याइंद्रायणी तांदळाला ग्राहकांची जास्त पसंती आहे. मावळ तालुका हा भाताचे आगार म्हणून ओळखला जातो. काही दिवसांपासून केंद्र सरकारने तांदळाची निर्यात कमी केली आहे, तसेच डिसेंबर, जानेवारीपासून नवीन तांदूळ बाजारात आला आहे.
यामुळे ७० रुपयांपेक्षा अधिक दराने विकणारा, इंद्रायणी, कोलम सध्या ५५ ते ६० रुपयांवर आला आहे. दिवाळीपूर्वी आंबेमोहर, बासमती, इंद्रायणी, कोलम या तांदळांचे भाव वाढले होते; नवा इंद्रायणी तांदूळ बाजारात दाखल होताच तांदळाचे दर कमी झाले.
कुठे उत्पादित होतो तांदूळ?महाराष्ट्रात गडचिरोली, वर्धा, नाशिक, चंद्रपूर, पुणे, तळेगाव, कोकण या भागांमध्ये तांदूळ सर्वाधिक उत्पादित होतो. महाराष्ट्रात नाशिक आणि मावळ भागातील इंद्रायणी तांदूळ सध्या ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. बेळगाव बासमतीलाही जास्त मागणी आहे.
आंध्र प्रदेश, कर्नाटकातून तांदूळ राज्यातजानेवारीनंतर आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतील तांदूळ राज्यातील बाजारपेठेत येतो. सध्या जिल्ह्यात, इंद्रायणी, कोलम या तांदळाला मागणी असून, दोन्ही तांदळांचे दर १० रुपयांनी कमी झाले आहेत. मात्र, जुन्या तांदळाला ग्राहकांची मागणी अधिक आहे. नव्या तांदळाला चिकटपणा येतो, तसेच चवीतदेखील फरक पडतो. विषेश म्हणजे जुना तांदूळ १० ते १५ रुपयांनी महाग आहे. बासमती तांदूळ १४० रुपये, तर आंबेमोहोर ८० रुपयांवर स्थिर आहे.
तांदळाचे भाव काय? (प्रतिकिलो)
प्रकार | आधीचा भाव | सध्याचा भाव |
बासमती | १८० | १४० |
इंद्रायणी | ६० | ५५ |
कोलम | ७० | ६० |
आंबेमोहर | ६८ | ६४ |
भाव कमी होणार का?भविष्यात विदेशात तांदळाची निर्यात केल्यास भावात तेजी येऊ शकते. सध्या निर्यात कमी असल्याने भाव स्थिर आहेत. निर्यात परिस्थिती कायम राहिल्यास भाव कमी होऊ शकतात. कारण नवा तांदूळ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रासह देशातील विविध बाजारांत दाखल होत आहे. देशात वरण-भात, मसाला भात आणि खिचडीसाठी तांदळाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
नवीन तांदूळ बाजारात दाखलडिसेंबर, जानेवारीपासून नवीन तांदूळ बाजारात आला आहे. त्यामुळे ७० रुपयांपेक्षा अधिक दराने विकणारा कोलम, इंद्रायणी सध्या ५५ ते ६० रुपयांवर आला आहे.
महाराष्ट्रातील तांदूळ सुगंधित व चवदार असल्याने देशभर विक्री होतो. सध्या भाव घटले असले तरी पुढील महिन्यापर्यंत दरात किमान ५ रुपयांनी घट होऊ शकते. -सचिन रायसोनी, व्यापारी, कामशेत
मावळमध्ये उत्पादित होणारा इंद्रायणी तांदूळ खायला रुचकर आणि चविष्ट आहे. महाराष्ट्रातील विविध भागात पिकणारा तांदूळ सुगंधित व चवदार असल्याने देशभर विक्री होतो. - सनी गदिया, व्यापारी, कामशेत