गतवर्षीच्या तुलनेमध्ये बासमती, दुबार, तिबार व मोगरा तांदळाचे दर कमी झाले आहेत; परंतु सामान्य नागरिकांकडून खरेदी करण्यात येणारा तांदूळ व कोलम, आयआरबी, मसुरीसह परिमल तांदळाचे दर वाढले आहेत.
एप्रिलमध्ये नवीन तांदळाची आवक वाढणार असून तेव्हा भाव काही प्रमाणात नियंत्रणात येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या धान्यामध्ये तांदळाचा प्रथम क्रमांक लागतो.
प्रतिदिन १५०० ते २ हजार टन तांदळाची विक्री होत असते. गुरुवारी मार्केटमध्ये ३३४ टन बासमती व १२४७ टन सर्वसामान्य नागरिक वापरत असलेल्या तांदळाची आवक झाली आहे. ३५ टन दुबार, २४ टन मोगरा व ६८ टन कोलम तांदळाची आवक झाली.
गतवर्षी ८३ ते १०२ रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या बासमतीचे दर आता ६५ ते १०० रुपयांवर आले आहेत. दुबार तांदूळ ५६ ते ७८ वरून ३५ ते ४५, तिबार तांदूळ ६४ ते ७७ रुपये किलोवरून ४५ ते ५५ रुपये किलोवर आला आहे. इतर तांदळाचे दर मात्र मोठ्या प्रमाणात वाढले आहेत
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील तांदळाचे दर
प्रकार | २०२३ | २०२४ |
बासमती | ८३ ते १०२ | ६५ ते १०० |
तांदूळ एसएलओ | २५ ते २८ | ३३ ते ३५ |
तांदूळ | २७ ते ४५ | ४० ते ७० |
दुबार | ५६ ते ७८ | ३५ ते ४५ |
तिबार | ६४ ते ७८ | ४५ ते ५५ |
मोगरा | ३० ते ४६ | ३० ते ४२ |
कोलम | ३६ ते ४७ | ४० ते ६५ |
आयआरबी | २८ ते ३५ | ३९ ते ५६ |
मसुरी | २८ ते ३२ | ३३ ते ३५ |
परिमल | २५ ते ३० | ३३ ते ३५ |
दर नियंत्रणात येतीलयंदा देशात तांदळाचे पीक चांगले झाले आहे. यामुळे तांदळाचा तुटवडा भासणार नाही. आवक वाढल्यास दरही नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. तांदळाचे दर आता खूप वाढणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जुन्याची आवक जास्त• नवीन तांदळाची आवक काही प्रमाणात सुरू झाली असली तरी एप्रिलमध्ये आवक वाढण्याची शक्यता आहे.• सद्यःस्थितीमध्ये जुन्या तांदळाची आवक जास्त आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देशभरातून तांदूळ विक्रीसाठी येत आहे. यावर्षी तांदळाचे उत्पन्न चांगले झाले आहे. एप्रिलमध्ये नवीन तांदळाची आवक वाढेल. यावर्षी दर नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे. - नीलेश वीरा, संचालक धान्य मार्केट