सांगली : हळदीचा नवा हंगाम सुरू झाला असून, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी नवीन हळदीच्या सौद्यांना सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी राजापुरी हळदीची ४९७ क्विंटल, तर परपेठ हळदीची ११७ क्विंटल आवक झाली. बावची (ता. वाळवा) येथील शेतकरी राजेंद्र आनंदराव पाटील यांच्या राजापुरी हळद प्रतिक्विंटल ३१ हजार रुपयांचा विक्रमी भाव मिळाला.
सरासरी १५ हजार रुपये क्विंटल भाव राहिला. पहिल्या दिवशी दोन हजार २२८ पोती विक्रीसाठी आली होती. सांगली मार्केट यार्डात नवीन हळद सौदे शुभारंभ जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील व बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते केला. मुहूर्ताचे सौदे नवीन हळद सौदे शुभारंभाला गणपती कृषी जिल्हा औद्योगिक सोसायटी येथून सुरुवात झाली. प्रथम हळद शेतीमाल पोत्यांचे पूजन करण्यात आले.
राजापुरी हळदीचे दर (प्रतिक्विंटल)किमान १०,५००कमाल ३१,०००सरासरी २०,७५०
परपेठ हळदीचे दरकिमान ८,६००कमाल १३,०००सरासरी १०,८००
सांगलीच्या बाजारपेठेवर शेतकऱ्यांचा विश्वासजिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील म्हणाल्या, सांगली बाजार समितीला वर्षानुवर्षांची परंपरा आहे. हळद, बेदाणा मार्केटमधील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. म्हणूनच परराज्यातील शेतकऱ्यांकडूनही आपला शेतीमाल सांगलीत आणला जात आहे. यामुळे सांगली बाजार समितीची उलाढाल वाढली आहे.