करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक सुरू झाली आहे. करमाळा तालुक्यासह परांडा, कर्जत व जामखेड तालुक्यातून ही ज्वारी येत आहे. ज्वारीला सध्या क्विंटलला ४ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
येणाऱ्या काळात आणखी आवक वाढणार असल्याची शक्यता आहे, असे बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर यांनी सांगितले. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज सरासरी १६०० पोती ज्वारी येत आहे.
त्याला कमीत कमी २५०० रुपये, तर जास्तीत जास्त ४५०० व सरासरी ३५०० रुपये दर मिळत आहे. कर्जत तालुक्यातील राशीन चापडगाव, परंडा तालुक्यातील काही गावे व जामखेड तालुक्यातील काही गावांतून ही ज्वारी येत आहे.
गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्याने दुष्काळ पडला आहे; मात्र शेवटच्या क्षणी काही प्रमाणात परतीच्या पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे ज्वारी बऱ्यापैकी आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. नवीन ज्वारीची काढणी व मळणी सुरू झाली असून, नवीन ज्वारीची आवक बाजार समितीत सुरू झाली आहे.