Join us

बाजारात आली नवीन ज्वारी; सात हजारांवर पोहोचलेला दर आता कुठे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 10:44 AM

सध्या नवीन ज्वारीला २८०० ते ४००० तर जुन्या ज्वारीचा दरही तेवढाच आहे. डिसेंबर, जानेवारीत जुन्या ज्वारीला पाच ते सात हजारांचा दर मिळाला होता. जुनी ज्वारी साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना डिसेंबर, जानेवारी या कालावधीत त्यांना ६००० ते ७००० पर्यंत प्रत्येक क्विंटल ज्वारीला भाव मिळाला.

विलास मासाळमंगळवेढा : तालुक्यात सध्या ज्वारी काढणी अन् खळीकरण सुरू आहे. हरभरा, करडई यांची मळणी यंत्रणेद्वारे मळणीचे काम अंतिम टप्यात आले आहे. दरम्यान, नवीन ज्वारीबाजार समितीत आल्याने जुन्या ज्वारीचा दर उतरला आहे.

सध्या नवीन ज्वारीला २८०० ते ४००० तर जुन्या ज्वारीचा दरही तेवढाच आहे. डिसेंबर, जानेवारीत जुन्या ज्वारीला पाच ते सात हजारांचा दर मिळाला होता. जुनी ज्वारी साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना डिसेंबर, जानेवारी या कालावधीत त्यांना ६००० ते ७००० पर्यंत प्रत्येक क्विंटल ज्वारीला भाव मिळाला.

त्यामुळे साठवून ठेवून विक्री केलेल्या शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. आता शेतकऱ्यांनी नवीन ज्वारीची पोती व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर विक्रीसाठी थप्पी मारून ठेवली आहे. प्रत्येक आठवड्याला लिलावाच्या बोलीप्रमाणे शेतकऱ्यांच्या ज्वारीला भाव मिळत आहे.

आता नवीन ज्वारी बाजारामध्ये विक्रीसाठी शेतकऱ्यांकडून येऊ लागल्याने भाव तीन हजारपासून ते साडेचार हजार रुपये आहे. त्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिक, नोकरीनिमित्त परगावी राहणारे नोकरदार ज्वारी खरेदी करू लागले आहेत.

हरभरा ५,९०० तर करडईचा दर पाच हजारांवरयंदा हरभरा, करडईला रब्बी हंगामात पाणी न मिळाल्याने फटका बसला आहे. दिवाळीत पडलेल्या पावसाचा फायदा मात्र ज्वारीला झाला. हरभरा ५४०० ते ५९०० रुपये आहे. करडईचा दर ४ हजार ते ५ हजार आणि गव्हाचा दर २४०० ते ३४०० सध्याचा दर शेतकऱ्यांना प्रतिक्चिटल मिळत आहे. सध्या कडब्याचा दरही कमी झाला असून हजार पेंडीला दहा हजार ते १४ हजारपर्यंत मिळतोय.

नवीन ज्वारी येण्याअगोदर याच जुन्या ज्वारीला साडेसहा आणि शेवटी सात हजार शेतकऱ्यांना दर मिळाला होता. मात्र आता बाजारात विविध भागांतून ज्वारी येऊ लागल्याने ज्वारीचे दर कमी झाले आहेत. - पांडुरंग नकाते, कृषी उत्पन्न बाजार

सध्या ज्वारीची भाकरी १५ ते २० रुपये विक्री होत आहे. नवीन ज्वारी खाण्यास, पचनास हलकी, आरोग्यदायी आहे. मालदांडी ज्वारीच्या भाकरीला मागणी जास्त आहे. - वैभव खांडेकर, हॉटेल व्यावसायिक

टॅग्स :ज्वारीबाजारमार्केट यार्डसोलापूरपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकाढणीहरभराकरडईशेतकरीपीक