यंदा जालना जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही, पाऊस नसल्याने सोयाबीनच्या उत्पादनात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावातही वाढ होत आहे. सध्या जुने सोयाबीन आणि नवे सोयाबीन जवळपास चार हजार ते साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटलने विकत आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्याने वर्तविली आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळणार आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन विकायची घाई करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
गतवर्षी नऊ हजारांचा भावगतवर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे सोयाबीनला आठ ते नऊ हजार रुपयांचा भाव मिळाला होता. यंदा त्यापेक्षाही चांगल्या भावाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. जालना जिल्ह्यात खरीप हंगामात सहा लाख हेक्टरवर पेरणी झालेली आहे. त्यात दोन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. तर अडीच लाख हेक्टरवर कापसाची लागवड झालेली आहे.
पाऊस नसल्यामुळे सोयाबीनला फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होणार आहे. त्यातच आता भाव वाढण्याची शक्यता आहे. भाव वाढल्यास फायदा होईल.- गणपत तळेकर, शेतकरी
यंदा पाऊस समाधानकारक झाला नाही. त्यामुळे सर्वच पिकांना याचा फटका बसला आहे. परिणामी, उत्पादन घटले आहे. भाव वाढ मिळाली तर झालेले नुकसान भरून निघेल. - गणेश राजबिंडे, शेतकरी
भविष्यात कसे असतील सोयाबीनचे दर दरम्यान कृषी विभागाच्या पुणे येथील स्मार्ट प्रकल्पातील तज्ज्ञांनी (अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : ०२० - २५६५६५७७) शेतमालाच्या संभाव्य किंमतीचा अंदाज वर्तविला आहे.
त्यानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत लातूर बाजारसमितीत सोयाबीनच्या किंमती ४७०० ते ५२०० रुपये प्रति क्विंटल इतक्या असणार आहेत. एफएक्यू कॉलीटीच्या ग्रेडच्या सोयाबीनसाठी हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यासाठी आयात केलेल्या सोयाबीन तेल आणि अमेरिकेतील सोयाबीन उत्पादनाचा अंदाज असा आधार घेतला आहे.
यंदा नोव्हेंबर २२ ते ऑगस्ट २३ या कलावधीत ३१.८२ लाख टन सोयाबीन तेलाची आयात भारताने केली. मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे ४ लाख टनांनी कमी आयात यंदा झाली असल्याचे एसईए अहवालावरून सांगण्यात आले आहे. याशिवाय भारतात सोयाबीनचे उत्पादन २०२३-२४ मध्ये १२० लाख टन इतके होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अमेरिकन कृषी विभागाच्या जुलै २०२३च्या अहवालानुसार जगात सन २३-२४मध्ये ४ हजार १०७ लाख टन सोयाबीन उत्पादन होण्याची शक्यता आहे. ते मागील वर्षाच्या तुलतेत ८ टक्क्यांनी अधिक आहे. त्याचाही परिणाम सोयाबीनच्या किंमतींवर राहण्याची शक्यता आहे. सध्या २०२३साठी देशात सोयाबीनच्या किमान आधारभूत किंमी ४३०० पेक्षा जास्त आहे, असेही स्मार्ट प्रकल्पाद्वारे नुकत्याच वर्तविलेल्या अंदाजात म्हटले आहे.
सध्याचे बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनचे दर असे आहेत (प्रति क्विंटल)
बाजार समिती | जात/प्रत | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|
२ ऑक्टोबर | |||||
सेनगाव | पिवळा | 150 | 4400 | 4600 | 4500 |
उमरखेड | पिवळा | 120 | 4600 | 4800 | 4700 |
काटोल | पिवळा | 60 | 3400 | 4350 | 4050 |
१ ऑक्टोबर | |||||
सिल्लोड | --- | 70 | 4500 | 4600 | 4550 |
उदगीर | --- | 3350 | 4750 | 4825 | 4787 |
अजनगाव सुर्जी | पिवळा | 163 | 3800 | 4580 | 4200 |
शेवगाव | पिवळा | 21 | 4100 | 4100 | 4100 |
औसा | पिवळा | 1614 | 4400 | 4789 | 4699 |
उमरखेड-डांकी | पिवळा | 120 | 4600 | 4800 | 4700 |
काटोल | पिवळा | 2 | 4361 | 4361 | 4361 |