हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील बाजार समितीच्या मोंढ्यात मागील आठवड्यापासून हळदीच्या दरात चढ-उतार सुरूच आहे. नवीन हळद शेतकऱ्यांकडे उपलब्ध झाली असून, या नव्या हळदीला १९ मार्च रोजी १७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला. येणाऱ्या दिवसात हळदीचे दर वाढतील की कमी होतील, अशा द्विधा मनःस्थितीत शेतकरी सापडला आहे.
वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात १९ मार्च रोजी हळदीच्या ४ हजार कट्ट्यांची आवक आली होती. नवीन हळद येणे सुरू झाली आहे. बिटात दर्जेदार हळद कांडीस १७ हजार ५०५ रुपयांचा दर मिळाला तर हळद मंडा १५ हजार ८३० रुपये प्रति क्विंटलने विक्री झाला. १८ मार्च रोजी हळद कांडीस १८ हजार २०५ रुपयांचा दर मिळाला होता.
गत आठवड्यात २१ हजार ६०० रुपयांपर्यंत हळद गेली होती. हळदीच्या दरात चढ-उतार येत आहे. दरातील चढ-उताराने हळद आता विक्री करावी की भाववाढीच्या प्रतीक्षेत ठेवावी, अशा द्विधा मनःस्थितीत शेतकरी आहेत. दरम्यान, येणाऱ्या दिवसात हळद उच्चांकी दर गाठेल, अशी शक्यता व्यापाऱ्यांतून वर्तविली जात आहे.
मंगळवार (दि.१९) राज्यात हळदीला मिळालेला दर व आवक
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
मुंबई | लोकल | क्विंटल | 618 | 15000 | 20000 | 17500 |
जिंतूर | नं. १ | क्विंटल | 8 | 15025 | 15025 | 15025 |
सांगली | राजापुरी | क्विंटल | 5496 | 15500 | 27000 | 21250 |