Join us

निर्यात शुल्कवाढीचा परिणाम नाही; सोलापुरात ११० ट्रक कांद्याची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2023 11:25 AM

तीनशे रुपयांची वाढ, सोलापुरातील कांदा दक्षिणेकडील राज्यात

केंद्राने निर्यात शुल्क ४० टक्के केल्याने नाशिकसह राज्यातील अनेक बाजार समितीत कांदा लिलाव बंद आहे. मात्र, सोलापूर बाजार समितीत सोमवारी कांदा लिलाव झाला असून ११० ट्रक कांद्याची आवक होती. शनिवारच्या तुलनेत कांद्याच्या दरातही तीनशे रुपयांची वाढ झाली.

त्यामुळे केंद्राच्या निर्णयाचा सोलापूर बाजार समितीवर परिणाम न झाल्याचे दिसून आले. सोलापूर बाजार समितीत राज्यात सर्वाधिक कांदा येतो. नाशिकच्या लासलगावलाही सोलापूरने मागे टाकले आहे. जानेवारी ते फेब्रुवारीच्या सिझनमध्ये सरासरी ८०० ते १००० ट्रक कांद्याची आवक असते. सोलापुरातील कांदा दक्षिणेकडील आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यात जातो.

केरळमध्ये सोलापूरच्या कांद्याला मागणी आहे. मात्र, सोलापूरचा कांदा थेट एक्सपोर्ट होत नाही. त्यामुळे निर्यात शुल्क वाढीच्या निर्णयाचा परिणाम सोलापूर बाजार समितीत अथवा शेतकऱ्यांवर झालेला नाही. सोमवारी लिलाव मरळीतपणे पार पडला आहे.

सुमारे १२५ ट्रक कांद्याची आवक होती. शनिवारच्या तुलनेत दरातही तीनशे रुपयांची वाढ झाली आहे. शनिवार १०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले, तर सोमवारी १०० ते ३५०० रुपये दर मिळाल्याचे व्यापारी संचालक केदार उंबरजे यांनी सांगितले

१०० ट्रक आवक कमी

शनिवारी सोलापूर बाजार समितीत २१० ट्रक कांद्याची आवक होती. सोमवारी झालेल्या लिलावात ११० ट्रक कांदा आलेला होता. त्यामुळे १०० ट्रक आवक कमी झाल्याचे व्यापायांनी सांगितले.

निर्यात शुल्कवाढीचा सोलापूर मार्केटवर परिणाम झालेला नाही. कारण, सोलापुरातील कांदा थेट एक्सपोर्ट होत नाही. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांत लिलाव बंद असताना सोलापुरातील सुरळीतपणे लिलाव झाला. व्यापारी आणि शेतकयांची संख्याही नेहमी सारखी होती.-केदार उंबरजे, व्यापारी संचालक, सोलापूर

टॅग्स :कांदाशेतकरीसोलापूरशेतीशेती क्षेत्रसरकार