कोकणातील हापूस आंबा देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी भारतीय डाक विभागाने 'फार्म टू फोर्क' ही नावीन्यपूर्ण संकल्पना आणली आहे. याद्वारे बागांमधून थेट देश- विदेशातील आंबाप्रेमींना दर्जेदार हापूस घरपोच पोहोचवण्यात येणार आहे.
यासाठी आपका दोस्त इंडिया ही टॅगलाईन दिली आहे. विशेष म्हणजे डाक विभागाच्या या सेवेचे दर इतर खासगी कुरिअर सेवांपेक्षा कमी असून त्यामुळे ग्राहकांना कमी दरात आंबे घरोघरी पोहोचवण्यात येणार आहे.
नवी मुंबई डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक मोहम्मद साहिद यांनी सांगितले की; फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याला ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी डाक विभागाने ही एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
यासाठी नवी मुंबई डाक विभागाने खासगी या कंपनीसोबत करार केला असून, त्याद्वारे शेतातील ताजे व दर्जेदार हापूस आंबे थेट ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवणार आहेत. भारतीय देशांतर्गत बाजारपेठेव्यतिरिक्त जपान, यूएसए, ऑस्ट्रेलिया, कोरिया प्रजासत्ताक, सिंगापूर आणि युरोप या देशांमधे सुद्धा कंपनी आपल्या फळांची निर्यात करत आहे.
'रेल डाक गतीशक्ती'चा वापर करण्याचे आवाहनभारतीय डाक विभागाच्या 'रोड ट्रान्सपोर्ट नेटवर्क'च्या माध्यमातून आतापर्यंत १२०० किलो वजनाच्या ३८० आंब्यांच्या पेट्यांची घरपोच डिलिव्हरी झाली आहे. आंबा उत्पादक शेतकरी आणि पुरवठादारांनी व्यवसाय वाढीसाठी डाक विभागाच्या पार्सल सेवेचा तसेच डाक विभाग आणि भारतीय रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने पुरवण्यात येणाऱ्या रेल डाक गतीशक्ती योजने'चा वापर करावा, असे आवाहन मोहम्मद साहिद यांनी केले आहे.
'या' कंपनीसोबत सामंजस्य करारमे. बेरिडेल फुड्स प्रा. लि. ही जपानला आंबे निर्यात करणाऱ्या सर्वात मोठ्या निर्यातदारांपैकी एक आहे. भारतीय डाक विभाग आणि प्रसिद्ध आंबा निर्यातदार मे. बेरिडेल फुड्स प्रा. लि. यांच्यातील सामंजस्य करार हा आंबा पुरवठा क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरणार असून, या भागीदारी अंतर्गत कंपनी फक्त भारतातील ग्राहकांनाच नाहीतर त्यांच्या आंतरराष्ट्रीय ग्राहकांनासुद्धा भारतीय डाक विभागामार्फत त्यांचे दर्जेदार आंबे पोहचू शकणार आहे.
अधिक वाचा: पदवीधर होता आले नाही एक विषय राहिला पण जयदीपने शेतीत असं काय केलं तुम्ही थक्क व्हाल