Join us

जूनवान पिवळी खाऊची पाने शेतकऱ्यांना करता आहेत मालामाल; गठ्ठयाला कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 15:55 IST

लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान व्यवसायाला सध्या ऊर्जितावस्था आली असून, पिवळी व जूनवान खाऊची पाने पान बाजारात भाव खाऊ लागली आहेत.

दिलीप कुंभारनरवाड: लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान व्यवसायाला सध्या ऊर्जितावस्था आली असून, पिवळी व जूनवान खाऊची पाने पान बाजारात भाव खाऊ लागली आहेत.

तापमानाचा चढू लागल्याने याचा थेट परिणाम पानवेलीवर होऊ लागला आहे. तरीही शेतकऱ्यांनी यावर मात करून पिवळी पाने उत्पादित केली आहेत. याला पान बाजारात चांगला दर मिळत आहे.

याशिवाय जूनवान पाने (गेली तीन महिने खुडा न केलेली पाने) शेतकऱ्यांना मालामाल करीत आहेत. सध्या या पानांना पंढरपूर, सांगोला, रत्नागिरी, पनवेल, खेड, फोंडा या बाजारपेठेत वाढती मागणी आहे.

३०० पानांची एक कवळी असते. याप्रमाणे १०,००० पानांच्या एका डप्प्याचा (गठ्ठा) दर २००० ते ३००० रुपयांपर्यंत स्थिर आहे. उन्हाळा जसा आणखी वाढेल तसे या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासत असून याचा परिणाम पान व्यवसायावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जानेवारी ते मार्च महिना हा पान वेलींच्या उतरणींचे महिने असून यावेळी पानांचा खुडा अल्प प्रमाणात केला जातो. पानवेली जमिनीवर उतरण करून पुन्हा सुराला लावली जात आहेत.

दरम्यानच्या काळात पानवेलीच्या बुंध्यास नव्या मुळ्या फुटून पानवेल पुन्हा उभी केली जात असल्याने यावेळी पानांचा फुटवा कमी प्रमाणात होत आहे. पान बाजारात पिवळ्या पानांना मागणी चांगली आहे.

अधिक वाचा: आयटीपेक्षा शेतीच देतेय जास्त पॅकेज; कोठारे बंधूंची टरबूज, द्राक्षातून लाखोंची कमाई

टॅग्स :शेतीशेतकरीपीकबाजारमार्केट यार्डपंढरपूररत्नागिरी