अक्षय्य तृतीयेमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मध्ये आंब्याची आवक वाढली आहे. बुधवारी १ लाख पेटी आंबा मार्केटमध्ये दाखल झाली आहे. कोकणातून ४७ हजार व इतर राज्यांतून ५३ हजार पेट्यांची आवक झाली असून, बाजारभावही नियंत्रणात आले आहेत.
आंबा हंगामामध्ये गुढीपाडवा, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. फेब्रुवारीपासून आंब्याची आवक होत असली तरी गुढीपाडव्यापासून आवक वाढण्यास सुरुवात होते व अक्षय्य तृतीयेला आवकचा विक्रम होतो. गत आठवड्यात आंब्याची आवक कमी झाली होती.
मंगळवारी १ लाख १३ हजार व बुधवारी १ लाख १ हजार पेट्या आंबा बाजार समितीमध्ये दाखल झाला आहे. कोकणातून ४७,३०३ पेट्या हापूस आंबा विक्रीसाठी आला आहे. दक्षिणेतील राज्यांमधून ५३,८४२ पेट्या आंबा विक्रीसाठी आला आहे.
हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यातबाजार समितीमध्ये हापूस ३०० ते ५०० रुपये डझन व किरकोळ मार्केटमध्ये ६०० ते १ हजार रुपये डझन दराने विक्री होत आहे. कर्नाटकमधील आंब्याला प्रतिकिलो १०० ते ११० रुपये भाव मिळत आहे. कोकणच्या हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असल्यामुळे आता इतर राज्यातील आंब्याची आवक वाढू लागली आहे.
मे अखेरीस गुजरातचा आंबा येणारहापूसची आवक यापुढे कमी होईल, मे अखेरीस गुजरातचा आंबा दाखल होईल. जूनच्या पहिल्या टप्प्यात जुन्नरचा आंबाही मार्केटमध्ये विक्रीसाठी येईल. यानंतर उत्तर प्रदेश व इतर ठिकाणचा आंबाही ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
अक्षय्य तृतीयेमुळे आंब्याची चांगली आवक होत आहे. हापूससह दक्षिणेकडील राज्यातून आंब्याची आवक होत आहे. बाजारभावही नियंत्रणात आहेत. मेअखेरीस गुजरात व जूनमध्ये जुन्नरच्या हापूसची आवक होईल. - बाळासाहेब बेंडे, व्यापारी
अधिक वाचा: Mango Market पहिल्या टप्प्यातील हापूस आंबा संपतोय; दुसऱ्या टप्पा २० मेपासून सुरू होणार