उन्हाळा तीव्र होत असल्याने लिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण झाली आहे. मात्र, हवामानातील लहरीपणामुळे उत्पादन घटल्याने बाजारात पुरवठा अपुरा पडत आहे. परिणामी, लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली असून, व्यापारी थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करत आहेत.
गेल्या सप्टेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे हस्त बहरावरील फळधारणेवर विपरित परिणाम झाला. फुलांची मोठ्या प्रमाणावर गळ झाल्याने उत्पादन घटले. आता एप्रिल-मे महिन्यात आंबिया बहराचा लिंबू बाजारात येईल, तोपर्यंत सध्या पुरवठा कमी असल्याने दर वाढले आहेत.
शेतकऱ्यांना सध्या चांगला दर मिळत असल्याने समाधान आहे. मात्र, एप्रिल-मे महिन्यात मोठ्या प्रमाणात आवक झाल्यास दर काहीसे स्थिर होऊ शकतात. त्याचवेळी, उन्हाळ्याच्या काळात मागणी वाढल्यास शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळू शकतो.
कट्टयाला १५०० चा भाव
सध्या व्यापारी १३ किलोचा कट्टा १३०० ते १५०० रुपये दराने खरेदी करत असून, अकोला बाजारात मोठ्या व्यापाऱ्यांकडे विक्री केली जात आहे. चिल्लर बाजारात लिंबू १३० ते १७० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. मागणी वाढत असल्याने येत्या काळात दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अवकाळी पाऊस आणि हिवाळ्यातील धुक्यामुळे लिंबाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. त्यामुळेच यंदा उत्पादन घटले आहे. सध्या मागणी जास्त असल्याने दर चांगले मिळत आहेत. - गणेश कंडारकर, लिंबू उत्पादक शेतकरी वाडेगाव जि. अकोला.
यंदा लिंबाचे उत्पादन घटल्याने बाजारात पुरवठा कमी आहे, त्यामुळे दर वाढले आहेत. सध्या आम्ही शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करत आहोत. मागणी कायम राहिल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. - शिवा हुसे, लिंबू व्यापारी, वाडेगाव जि. अकोला.
उन्हाळा सुरू होताच लिंबाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. सरबत, चटणी आणि पदार्थामध्ये लिंबाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. दर असेच वाढत राहिले, तर हॉटेल व्यावसायिकांना लिंबूसाठी विचार करावा लागेल. - जगदीश लोध, हॉटेल व्यावसायिक, वाडेगाव.
बाजारात लिंबूला भाव मिळत असला तरी आज रोजी फळधारणा कमी झाली आहे. त्यामुळे भाव वधारल्याचा फारसा फायदा आम्हाला होत नसल्याने चिंता आहे. - रमेश बराटे, शेतकरी, दिग्रस बु. जि. अकोला.
राज्यातील लिंबू आवक व दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
12/03/2025 | ||||||
कोल्हापूर | --- | क्विंटल | 29 | 5000 | 10000 | 7500 |
जळगाव | --- | क्विंटल | 8 | 5000 | 10000 | 7500 |
छत्रपती संभाजीनगर | --- | क्विंटल | 33 | 4500 | 7500 | 6000 |
श्रीरामपूर | --- | क्विंटल | 13 | 8000 | 11000 | 9500 |
राहता | --- | क्विंटल | 3 | 4000 | 11000 | 7500 |
नाशिक | हायब्रीड | क्विंटल | 14 | 3000 | 5000 | 3500 |
कल्याण | हायब्रीड | क्विंटल | 3 | 8000 | 10000 | 9000 |
धाराशिव | कागदी | क्विंटल | 7 | 4500 | 12000 | 8250 |
सोलापूर | लोकल | क्विंटल | 22 | 850 | 10000 | 6000 |
अमरावती- फळ आणि भाजीपाला | लोकल | क्विंटल | 10 | 7000 | 8000 | 7500 |
पुणे | लोकल | क्विंटल | 395 | 1000 | 5000 | 3000 |
नागपूर | लोकल | क्विंटल | 70 | 6000 | 7000 | 6750 |
मुंबई | लोकल | क्विंटल | 787 | 3000 | 5000 | 4000 |
भुसावळ | लोकल | क्विंटल | 2 | 8000 | 8000 | 8000 |
सौजन्य : कृषी पणन महामंडळ महाराष्ट्र राज्य.