हिंगोलीतील सेनगाव शहरातील आठवडी बाजारात मकर संक्रांत सणाच्या तोंडावर भाजीपाला बाजार भरगच्च भरला. परंतु भाजीपाल्याचे भाव कडाडल्याने ग्राहक थोड्या प्रमाणात भाजीपाला घेताना दिसून येत होते.
१५ जानेवारी रोजी मकर संक्रांत असल्याने बुधवारी भरलेल्या आठवडी बाजाराला महत्त्व प्राप्त झाले होते. आठवडी बाजारात भाजीपाल्यांची आवक चांगली असली तरी महागाईमुळे सर्वच भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडले होते. ८० रुपये किलोने मिळणाऱ्या शेवग्याच्या शेंगा १०० ते १२० रुपये किलोने विकल्या गेल्या. ७० रुपये किलो रुपयाने मिळणारे वांगे ८० ते ९० रुपये किलोने विकत घ्यावे लागले, असे ग्राहकांनी सांगितले.
मकर संक्रांत पाच दिवसांवर येऊन ठेपली असल्यामुळे सेनगाव व परिसरातील अनेक ठिकाणच्या नागरिकांनी भाजीपाला आतापासूनच खरेदी केला. एरव्ही आठवडी बाजारात १२ वाजेदरम्यान येणारे भाजीपाला विक्रेते यावेळेस संक्रांतीमुळे आठवडी बाजारात सकाळी दहा वाजेदरम्यान येऊन भाजीपाला विक्री करताना पाहायला मिळाले.
असा राहिला भाजीपाल्याचा भाव
■ आठवडी बाजारात गवार शेंग ४०, हिरवी मिरची ८०, फूल व पानकोबी ८०, कार्ले ८०, टोमॅटो १५, कांदा ३० रुपये किलो भाव राहिला होता. मकर संक्रांतीपर्यंत अजून किती भाव वाढतील, हे आजतरी सांगता येत नाही, असे शेख पाशू या भाजीपाला विक्रेत्याने सांगतिले.