सोपान कोठाडे
मिरची विक्रीचे केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील शुक्रवारच्या बाजारात पहिल्याच दिवशी ७० क्विंटलची आवक झाली. यावेळी भिकटोर मिरचीला २६ रुपये, बळीराम मिरचीला २५ रुपये तर सिमला मिरचीला प्रतिकिलो ३५ रुपयांचा दर मिळाला.
आमठाणा येथील तेजा फोर मिरची देश-विदेशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे खरेदीसाठी विविध ठिकाणांहून व्यापारी येतात. तेजा फोर मिरचीची शेतकऱ्यांनी महिनाभरापूर्वी लागवड केली आहे. जून महिन्यात ही मिरची काढण्यासाठी येते. असे असले तरी ता भागातील शेतकऱ्यांनी १५ मार्च पूर्वी लागवड केलेली भिकटोर, बळीराम, सिमला ही मिरची काढणीला आली असून शुक्रवारी या मिरचींचा पहिला लिलाव झाला. पहिल्या दिवशी ७० क्विंटल मिरचीची आवक झाली.
यावेळी झालेल्या लिलावात स्थानिक व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी भिकटोर मिरचीला २६ रुपये, बळीराम मिरचीला २५ रुपये तर सिमला मिरचीला प्रतिकिलो ३५ रुपयांचा दर मिळाला. मिरची घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन चौधरी, व्यापारी सुभाष लोखंडे, बाजीराव मोरे, काशिनाथ सोमासे, शेतकरी पांडुरंग कदम, विकास मोरे, संजय मोरे आदी उपस्थित होते.
गुणवत्ता टिकली, तर चांगला भाव
• मिरचीची गुणवत्ता टिकली तर भाव चांगले राहतात. यावर्षी मिरचीची लागवड खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे; मात्र मिरची मार्केटमध्ये येईपर्यंत किती काळ टिकते, यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत, असे येथील व्यापारी राजू सुसर यांनी सांगितले.
• दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी तापमान खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. यामुळे मिरचीचे प्लॉटचे प्लॉट खराब होत आहेत. एवढा महिना तापमान असेच राहिले तर वाचलेले मिरचीचे प्लॉट खूप खराब होतील, असेही सुसर म्हणाले.
हेही वाचा - हळदीला मिरचीची दिली जोड; सुभाषरावांचे दोन्ही पिकातून उत्पन्न झाले गोड