वाढत्या उष्यामुळे आंबा मोठ्या प्रमाणावर तयार होऊ लागल्याने वाशी बाजारात (नवी मुंबई) आंब्याची आवक वाढली आहे. शनिवारी ५५ हजार आंबा पेट्या विक्रीला आल्या. आंब्याची निर्यातही वाढली असून, मुंबई उपनगरातून विक्री सुरू आहे.
आवक वाढल्याने दर घसरला असून पेटीला १५०० ते ३५०० हजार रुपये दर मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत आवक अधिक असल्याने दर गतवर्षीपेक्षा कमी झाला आहे. पेटीमागे हजार रुपयांचा फरक पडत आहे.
हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर होत असल्याने दरवर्षी उत्पादनात घट होत आहे. यावर्षी आंबा हंगाम चांगला असेल, असा विश्वास बागायतदारांना होता. मात्र अवेळी पडलेला पाऊस, नीचांकी तापमान यामुळे कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढतच राहिला. तुडतुडा, थ्रीप्सचे नियंत्रण महागडी कीटकनाशके वापरूनही होत नसल्याने बागायतदार हवालदिल झाले होते.
बागायतदारांनी थ्रीप्सबाबत संशोधनासाठी कोकण कृषी विद्यापीठाकडे साकडे घातले आहे. गतवर्षीच्या तुलनेत उत्पन्न चांगले आहे. मात्र हवामानातील बदलामुळे काही प्रमाणात घटही झाली आहे. अन्यथा बागायतदारांना भरघोस उत्पन्न मिळाले असते. यावर्षी उत्पन्न वाचवण्यासाठी बागायतदारांना खर्चही मोठ्या प्रमाणावर करावा लागला आहे. त्या तुलनेतर दर नसल्यामुळे बागायतदारांना आर्थिक फटका बसत आहे.
सध्या वाशी बाजारामध्ये ५० ते ५५ हजार आंबा पेट्या रत्नागिरी जिल्ह्यातून पाठवण्यात येत आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर आंबा काढणी करणारे काही बागायतदार आहेत. परंतु पाडव्यालासुध्दा ५० ते ५५ हजार आंबा पेटी विक्रीला असेल असे सांगण्यात येत आहे. सध्या आखाती प्रदेश, युरोप, अमेरिका, सिंगापूर, हाँगकाँगमध्ये आंबा विक्रीला पाठवला जात आहे.
यावर्षी काही बागायतदारांचा आंबा सुरु झाला असला तरी काहींचा मात्र अद्याप मुहूर्त करायचा आहे. आंबा पेटीला किमान तीन हजार रुपये मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र १,५०० ते २,५०० रुपये दर मिळत आहे. खर्चापेक्षा कमी दर असल्याने ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत आहे. - राजन कदम, बागायतदार, रत्नागिरी