फेब्रुवारी महिना सुरू झाला की, तरुणाईला वेध लागतात ते व्हॅलेंटाइन वीकचे, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून शहरासह सर्वत्र व्हॅलेंटाइन डेचा माहौल असून दुकानातून विविध गिफ्टस खरेदीसह प्रेमाचे प्रतीक असणारा फुलांचा राजा गुलाबालाही चांगलीच मागणी वाढली आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुलाबाने व्हॅलेंटाइन डे निमित चांगलाच भाव खाल्ला असून भाव थेट दुपटीने वाढला आहे.
गुलाब व्हॅलेंटाइनच्या पूर्वसंध्येला ४०० रुपये प्रती गड्डीने विकला गेला, प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाबाचे लाल फूल देण्याची प्रथा आहे. त्यामुळे व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी गुलाबांना मोठी मागणी असते. नगरच्या फुलांच्या बाजारात व्हॅलेंटाइन डे निमित्त पुणे, हैदराबाद, मुंबई, माळशेज घाट परिसर, कल्याण या भागातून गुलाब फुले विक्रीला आले असल्याचे येथील व्यापारी सूरज कोके यांनी सांगितले.
चार दिवसांपासून एक गुलाबाचे फूल २० रुपयाला होते तर मात्र, मंगळवारी तेच फूल ४० रुपयांना विकले गेले.
प्रेमाचे प्रतीक बनले गुलाब
रोमनमध्ये गुलाबाला त्याच्या सुगंध आणि विविधतेमुळे प्रेम आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जात असे. पुढे हे जगभर पसरले. लोकांनी गिफ्ट म्हणून गुलाब देऊन आपले प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्यास सुरुवात केली. म्हणूनच जेव्हा प्रेमाचा आठवडा सुरु होतो, तेव्हा पहिला दिवस प्रेमाचे प्रतीक असलेल्या गुलाबाला समर्पित केला जातो आणि रोझ डे साजरा केला जातो.
म्हणून गुलाब फूल देण्याची प्रथा सुरू झाली
• यूनान आणि ग्रीक पौराणिक कथेनुसार प्रेम आणि सौंदर्याची देवी मानली जाणारी ऍफ्रोडाइट इतकी सुंदर होती की, ती जिथे गेली तिथे गुलाब उमलायचे.
• ऍक्रोडाइटमुळे गुलाब, प्रेम आणि इच्छेचे प्रतीक मानले गेले. असे सांगितले जाते.
नगरच्या फुलांच्या बाजारात व्हॅलेंटाइनसाठी मागणी असणाऱ्या डच गुलाब फुलांना मोठी मागणी वाढली. या फुलांच्या भावात ३० ते ५० टक्के वाढ झाली आहे. २०० रुपयांची गड्डी ४०० रुपयांपर्यंत विकली. - वसंत आगरकर, फुलांचे व्यापारी, अहमदनगर
आमच्याकडे चार एकर गुलाब फुलांची शेती आहे. व्हॅलेंटाइन डे जवळ आला की, पाच-सहा दिवस अगोदरच व्यापारी फुले खरेदी करून शीतगृहात ठेवतात. यंदा बाजारभाव पण चांगले मिळाले, डच व्हरायटीला जास्त मागणी होती. - अप्पाजी शिंदे, फुल उत्पादक शेतकरी, अकोळनेर