Join us

व्यापाऱ्यांकडून जागेवर टरबूजाची होतेय कमी दरात खरेदी; शेतकरी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 3:35 PM

गारपीटीने फळांना तडे

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी, अकोला देव, बुटखेडा, देळेगव्हाण परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टरबूज, खरबुजाची लागवड केली. मात्र, बदललेले वातावरण, विहिरीतील पाण्याच्या पातळीत झालेली घट. यामुळे मुबलक पाणी न मिळाल्याने टरबूज व खरबुजाच्या पिकाला आधीच फटका बसला आहे. त्यात आता अवकाळी पावसाचाही समावेश झाला आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.

आतापर्यंत टरबुजांचा एक तोडा निघाला. तोही ८ रुपये किलोने राजुर येथील व्यापाऱ्यानी जागेवर खरेदी केला. परंतु, बाजारात २० ते २५ रुपये किलोने व्यापारी विकत असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक गावांमध्ये टरबूज व खरबूज आणि काकडीची लागवड केली आहे.

मात्र, यंदा एप्रिलमध्ये सहा, तर मेमध्ये आतापर्यंत दोनवेळा अवकाळी पडल्याने फळांची नासाडी झाली. परिणामी, उत्पादनात मोठी घट होणार आहे. त्यामुळे खते, बी-बियाणे, मशागतीसाठी झालेला खर्चही वसूल होतो की नाही, अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

एका एकरासाठी असा झाला होता खर्च

मल्चिंग१५ हजार
ठिबक२५ हजार
शेत नांगरणी२ हजार
टरबुजांची रोपे७ हजार
रोटोव्हेटर१ हजार
मजुरी८ हजार
खत-बियाणे५ हजार

यंदा अवकाळीमुळे लागवडीचा खर्चही निघाला नाही

गेल्या वर्षी एका एकरात टरबुजांची लागवड केली होती. त्यात चांगले उत्पादन झाले. परंतु, यंदा टरबुजांची लागवड केल्यापासून वादळवाऱ्यासह पावसाच्या सरी पडत आहेत. त्यामुळे लागलेल्या फळांचे मोठे नुकसान होत असूनही, उत्पादन घटणार आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी एक तोडा विक्री केला आहे. तो व्यापाऱ्याने जागेवरच आठ रुपये किलोने खरेदी केला आहे. त्यामुळे यंदा लागवडीचा खर्चही निघणार नाही. - सोमीनाथ अंभोरे, देळेगव्हाण

टरबूज, खरबुजाची छोटी-छोटी फळे लागली फुटू

यंदा सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्यामुळे खरिपासह रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. परंतु, काही शेतकऱ्यांनी विहीर, शेततळ्यांमध्ये पाण्याची साठवण करून टरबूज, खरबुजाची लावगड केली आहे. मात्र, एप्रिल महिन्यात झालेल्या वादळवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. यावेळी काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. त्यामुळे लागलेली छोटी-छोटी फळे फुटून गेली होती.

हेही वाचा - स्पर्धा परीक्षा सोडून माळरानात फुलविली फळबाग; मराठवाड्यात परदेशी फळांचा थाट

टॅग्स :बाजारफळेशेतीशेतकरीमराठवाडादुष्काळमार्केट यार्ड