माथाडी कामगारांनी गुरुवार, दि. १४ डिसेंबर रोजी एकदिवसीय संप पुकारला आहे. त्यामुळे नवी मुंबईचा फळबाजार बंद राहणार असून, पालघर जिल्ह्यातील प्रमुख फळपीक असलेल्या चिकूच्या सुमारे १०० टन निर्यातीला त्याचा फटका बसणार असल्याचे चिकू बागायतदारांनी लोकमत'ला सांगितले.
डहाणू आणि तलासरी प्रतिदिन १०० टन चिकू या फळबाजारात जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली. माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगारांनी लाक्षणिक संप पुकारला आहे. हा याबाबतची माहिती दी फ्रंट ऑफ युनायटेड फ्रूट्स असोसिएशनने पालघर जिल्ह्यातील फळव्यापाऱ्यांना दिल्यानंतर चिकू बागायतदार व मजुरांपर्यंत पोहचविण्यात आली. पालघर जिल्ह्यातील चिकू हे प्रमुख बागायती पीक असून ४,४१३ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. त्यापैकी सर्वाधिक डहाणू (३३५५.५६ हेक्टर), पालघर (५३७.९३ हेक्टर), तर तलासरी (२५२.३६ हेक्टर) क्षेत्र असून, सर्वाधिक फटका या तालुक्यांना बसणार आहे.
डहाणू आणि तलासरी या दोन तालुक्यांतून प्रतिदिन किमान दहा मालवाहू ट्रक १०० टन चिकू नवी मुंबईच्या फळबाजारात जातात. एक चिकूतोड मजूर सरासरी ६० किलो चिकू तोडतो. या एकदिवसीय संपाचा परिणाम मोठ्या मजूरवर्गावर तसेच बागायतदार आणि व्यापारीवर्गावर होणार आहे. संपाच्या दृष्टीने बागायतदारांना फळतोडणीचे नियोजन करावे लागणार आहे.
संपात संपूर्ण मार्केट राहणार बंद
- माथाडी अधिनियम सुधारणा विधानसभा विधेयक क्र. ३४ मागे घेणे व माथाडी अधिनियमाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा बंदोबस्त करणे, अधिनियमाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होण्यासाठी उपाययोजना करणे.
- माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगारांचा गुरुवार, दि. १४ डिसेंबर रोजी हा लाक्षणिक संप पुकारला आहे.
- या संपात संपूर्ण मार्केट बंद ठेवण्यात येणार असल्याचे आवाहन व्यापारी, शेतकरी ग्राहक आणि ट्रान्सपोटर्स इत्यादींना करण्यात आले आहे. त्यामुळे १४ डिसेंबरला माल न पाठविण्याची विनंती दि फ्रंट ऑफ युनायटेड फ्रूट्स असोसिएशनच्या कार्यकारिणीने केली आहे.