नाशिक : हमाली आणि तोलाई या प्रश्नांसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे बागलाण तालुका शेतकरी संघटनेच्या माध्यमातून स्थानिक ठिकाणी कांदा विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर आता लासलगाव शेतकरी संघटनेच्या माध्यमातून खाजगी कांदा लिलाव मार्केट सुरू करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
२००८ साली लेव्हीसह मजुरीची रक्कम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हिशोब पावतीतून कपात केली जात होती. म्हणून त्यावेळी काही शेतकऱ्यांनी मिळून औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने सांगितले की, ही रक्कम खरेदीदारांकडून कपात करावी. मात्र, या निर्णयानंतर व्यापारी असोशिएशनने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. मुंबई हायकोर्टाने ही बाब स्थानिक जिल्हा न्यायालयात मांडण्यास सांगितले. त्यानुसार व्यापाऱ्यांनी निफाड न्यायालयात दावे दाखल केले.
याचवेळी मात्र माथाडी बोर्डाने व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवल्या. या नोटिसानुसार लेव्हीची रक्कम शेतकऱ्यांकडून न घेता व्यापाऱ्याकडून वसूल करावी असे सांगण्यात आले. सद्यस्थितीत ही बाब न्यायप्रविष्ठ असल्याने हा तिढा सुटलेला नाही. मात्र शेतकऱ्याकडून हमाली तोलाईची रक्कम वसूल केली जात आहे. पण लेव्हीसाठी व्यापाऱ्यांना तगादा लावला जात आहे.
त्यामुळे आता व्यापाऱ्यांनी ठरवलं की, शेतकऱ्यांकडून मजुरी घ्यायचीच नाही. म्हणजे लेव्हीचा प्रश्नच उद्भवणार नाही. मात्र आता या निर्णयाच्या पार्शवभूमीवर नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर बाजार बंद ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान करणारा असल्याचे शेतकरी संघटनांकडून सांगण्यात येत आहे.
या सर्व प्रकारानंतर आता शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने नाशिकमधील अनेक बाजार समित्यांमधील लिलाव सुरू झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना होणारा तोटा थांबणार आहे.
(Onion Market in Nashik Start)