सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सुमारे ८०० ट्रक कांद्याची आवक झाली होती. होती त्यामुळे दोन टप्यांत लिलाव सुरू ठेवल्याने तीन वाजेपर्यंत प्रक्रिया चालली. ट्रक भरून बाहेर पाठविण्यासाठी बुधवारी लिलाव बंद राहणार आहे, तर गुरुवारी वेळा अमावास्यानिमित्त लिलाव बंद राहणार आहे. दरम्यान, संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीत आंदोलन करीत व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या पिळवणुकीचा पाढा वाचला.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठी आवक असते. मागील महिनाभरापासून दररोज ५०० पेक्षा अधिक ट्रक कांद्याची आवक सुरू आहे. सोमवारी ही ८०० ट्रक कांद्याची आवक होती. त्यामुळे लिलावानंतर यार्डातील माल बाहेर काढण्यासाठी मंगळवारी विलंब झाला. त्यानंतर सकाळी अकरा वाजल्यापासून ऑइल मिल परिसरात लावलेल्या कांद्याचा लिलाव झाला. त्यानंतर दुसरा टप्प्यात कांदा बाजारातील प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी विलंब झाला. आवक वाढल्याने दरात आणखी घसरण झाली आहे. ८०० ते पंधराशे रुपयांपर्यंत दर मिळाला. दुपारी लिलाव संपल्याने गाड्या भरून पाठविण्यासाठी विलंब लागणार आहे. त्यामुळे बुधवारी लिलाव बंद करण्यात आलेला आहे, तर गुरुवारी वेळा अमावास्यानिमित्त लिलाव होणार नाही. आता दोन दिवस कांदा मार्केट बंद राहणार असल्याने शुक्रवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.
व्यापारी वीस दिवसांनंतरचा चेक देत असल्याचा आरोपबाजार समितीच्या चुकीच्या नियोजनामुळे व व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोर आंदोलन केले. लिलाव झाल्यानंतर व्यापारी २० दिवसांनंतर चेक देतात. चेक बाउन्स होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे अशा अडत व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी केली.
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेतमंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. कारण, शेतातील कांदा काढून ठेवला आहे. त्यात दोन दिवस लिलाव बंद राहणार आहे. आता ठेवण्यासाठी खर्च करावा लागणार आहे. आधी भाव नाही. त्यात खर्चच वाढत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.
कांद्याची आवक वाढलेली आहे. सोमवारी लिलावानंतर गाड्या बाहेर काढण्यास विलंब झाला. मंगळवारी आवक वाढली. त्यामुळे ऑइल मिलच्या जागेत कांदा उतरवून लिलाव करण्यात आला. त्यानंतर कांदा मार्केटमध्येही लिलाव झाला. राज्यातील इतर बाजार समितींच्या तुलनेत सोलापुरातील दर अधिक आहे. - केदार उंबरजे, व्यापारी संचालक