Lokmat Agro >बाजारहाट > चिंगळ्या कांद्याला मोठ्यापेक्षा जास्त भाव मिळाला, तरी हरीभाऊ का रडले?

चिंगळ्या कांद्याला मोठ्यापेक्षा जास्त भाव मिळाला, तरी हरीभाऊ का रडले?

onion export ban controversy had made onion farmer cry | चिंगळ्या कांद्याला मोठ्यापेक्षा जास्त भाव मिळाला, तरी हरीभाऊ का रडले?

चिंगळ्या कांद्याला मोठ्यापेक्षा जास्त भाव मिळाला, तरी हरीभाऊ का रडले?

कांदा निर्यातीचे धरसोड सरकारी धोरण आणि निसर्गाने दिलेला दगा यामुळे हरिभाऊ शिंदेंसारख्या अनेक शेतकऱ्यांवर भर बाजारात रडण्याची वेळ येते. कांदा, कापूस, सोयाबीन, दुध, ऊस, मसूर, भात आणि आता तूर व हरभराही... सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या वाट्याला क्रूर चेष्टाच येत आहे. जाणून घेऊ देशमानेच्या हरीभाऊंची वास्तव कहाणी.

कांदा निर्यातीचे धरसोड सरकारी धोरण आणि निसर्गाने दिलेला दगा यामुळे हरिभाऊ शिंदेंसारख्या अनेक शेतकऱ्यांवर भर बाजारात रडण्याची वेळ येते. कांदा, कापूस, सोयाबीन, दुध, ऊस, मसूर, भात आणि आता तूर व हरभराही... सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या वाट्याला क्रूर चेष्टाच येत आहे. जाणून घेऊ देशमानेच्या हरीभाऊंची वास्तव कहाणी.

शेअर :

Join us
Join usNext

हरिभाऊ शिंदे लासलगावच्या उपबाजार असलेल्या विंचूर बाजार समितीत कांदा विक्रीसाठी घेऊन आले, तेव्हा त्यांच्या कांद्याचं वजन ९ क्विंटल २० किलो इतकं भरलं. बाजारापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावरील देशमाने येथून ते आले होते. लिलावानंतर त्यांना १४०० रुपयांचा प्रति क्विंटल भाव मिळाला, तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणीच आलं. कारण तो कांदा अगदी लहान आकाराचा होता, त्याला इतका भाव मिळाला आणि दुष्काळाच्या कळा सोसत जो चांगल्या दर्जाचा कांदा काढला, त्याला मात्र केवळ ११०० रुपयांचा सरासरी भाव मिळाला. कांदा निर्यातीच्या सरकारी धोरणानंतर हरिभाऊ शिंदेंसारख्या हजारो शेतकऱ्यांच्या वाट्याला लहरी बाजाराची क्रूर चेष्टाच वाट्याला आली.

हरिभाऊ सांगतात की यंदा त्यांनी लेट खरीपाच्या कांद्याची एकरभर लागवड केली होती. पण ऑगस्टमध्ये २१ दिवस पावसाचा खंड पडल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. कमी पाण्यात कांदा पोसायचा कसा हा प्रश्न होता. त्यांची शेती पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनावर अवलंबून आहे. मात्र यंदा धरणातच कमी पाणी आल्याने विसर्गही त्याच प्रमाणात झाला. पण हाडाचे शेतकरी असलेल्या हरीभाऊंनी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा उत्पादन घ्यायचं ठरवलं होतं. त्यानुसार त्यांनी स्प्रिंकलर बसवून त्या आधारे कांदा पोसला. ‘साहेब, पाण्याचा लय प्रश्न होता, पण स्प्रिंकलरवर मी कांदा जगवला,’ ते हरीभाऊ कळवळून सांगत होते. याशिवाय मेहनत मशागत ती वेगळीच. 

हरिभाऊंनी ऑगस्टमध्ये कांदा लागवडीचा निर्णय घेतला, तेव्हा कांद्याचे बाजारभाव क्विंटलमागे ४ ते ५ हजारापर्यंत जाण्याच्या तयारीत होते. त्यामुळे डिसेंबरनंतर बाजारात येणाऱ्या आपल्या लाल कांद्याला नाही चार तर किमान २ ते ३ हजार दर मिळतील अशी त्यांना अपेक्षा होती. पण झाले भलतेच. कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले आणि कांद्याचे बाजारभाव कोसळून थेट दोन अडीच हजारांवर आले. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे मॉन्सूनच्या आघाडीवरही आनंदी आनंद होता. याच महिन्यात लहरी मॉन्सूनने तब्बल २१ दिवस रजा घेतली. विशेष म्हणजे यंदा हवामान विभागासह तथाकथित हवामानतज्ज्ञांनी मॉन्सून चांगला बरसेल, तसेच तो ७ ते १० जूनला येईल असा अंदाज दिला होता. पण तो काही खरा ठरला नाही. मुळात मॉन्सून यायला जुलै उजाडला आणि त्यानंतर पेरण्या सुरू झाल्या. या सर्वांचा त्रास हरीभाऊ शिंदेसारख्या लाखो शेतकऱ्यांना सोसावा लागला.

नाशिक जिल्ह्यात दरवर्षी खरीप, लेट खरीप आणि रब्बी या तीन हंगाममिळून साधारणत: ५ लाख हेक्टरवर कांदा लागवड होते. त्यातही येथील शेतकरी खरीप आणि लेट खरीप, ज्याला रांगडा कांदा म्हणतात, त्याचे क्षेत्र कमी लागवड करतात, तर उन्हाळी किंवा रब्बी कांद्याचे क्षेत्र वाढवतात. कारण खरीपात येणारा लाल कांदा हा नाशवंत असतो, तो टिकत नाही. हरीभाऊंनी या एक एकर कांद्यासाठी सुमारे ४५ हजार निव्वळ लागवड खर्च केला. त्यात वीजबिल, त्यांच्या घरच्यांची व स्वत:ची मजूरी हे त्यात गृहीत धरलेले नाही. मोठ्या मेहनतीने कमी पाण्यावर त्यांनी एका एकरातून ६० क्विंटल उत्पादन घेतले. मात्र जेव्हा त्यांनी पहिलाच कांदा बाजारात आणला, तेव्हा निर्यातबंदीचा निर्णय होऊन कांद्याचे भाव कमीत कमी ३०० तर जास्तीत जास्त १४०० व सरासरी ११०० होते. हरीभाऊंनी पिकवलेल्या लाल चकचकीत मोठ्या आकाराच्या कांद्याला स्वाभाविकपणे हजार ते १२००च्या दरम्यान भाव मिळाला. मोठ्या आकाराचा, दर्जेदार असा सुमारे ५० क्विंटल कांदा त्यांना सरासरी ११०० रुपये प्रति क्विंटलने विकावा लागला. तेव्हा त्यांच्या मनाला प्रचंड यातना होत होत्या.

दरम्यान मागच्या रविवारी म्हणजेच १८ फेब्रुवारी रोजी कांदा निर्यातबंदी उठवल्याची चर्चा झाली आणि अनेक नेते व केंद्रीय मंत्र्यांमध्ये त्याचे कॅमेऱ्यासमोर श्रेय घेण्याची चढाओढ लागली. त्यात गदारोळात लासलगावी कांदा वधारला. दुसऱ्या दिवशी शिवजयंतीच्या मुहूर्तावर सुमारे ८ हजार क्विंटल कांदा विंचूर-लासलगाव बाजारात दाखल झाला. त्यात हरीभाऊ शिंदेही आपल्याकडचा शेवटचा बारीक-चिंगळ्या कांदा घेऊन दाखल झाले होते.

चांगल्या कांद्याला अकराशे रुपये मिळाला आता या चिंगळ्या कांद्याला किती मिळणार? फार-फार तर ५०० रुपये असा ते विचार करत असतानाच त्यांचा कांदा १४०० रुपयांनी पुकारला गेला. तेव्हा त्यांना धक्काच बसला. व आपल्यासोबत बाजार व्यवस्थेने क्रूर चेष्टा झाली याची जाणीवही होऊन त्यांच्या संतापाची जागा हतबलतेने घेतली आणि आश्चर्याची जागा अश्रूंनी.

‘यंदा कांद्यात नुकसान झालं हे आम्ही स्वीकारलं होतं, तरीही निर्यातबंदी उठवली, पुन्हा घातली असं सुरू झालं. त्यातून माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याची भर बाजारात चेष्टाच झाली’ हरीभाऊ शिंदे भावूक होऊन सांगत होते. ‘‘आता निर्यात जरी सुरू केली, तरी आम्हाला काय फायदा, शेतकऱ्याकडचा कांदा संपला, त्याच्याकडे आता फक्त चिंगळ्याच राहिल्यात’’ मळलेले साधे कपडे घातलेले हरीभाऊ डोळ्यांच्या कडा पुसत पाठमोरे झाले, पण बाजार व्यवस्थेवर एक जोरदार टिप्पणी करूनच...

Web Title: onion export ban controversy had made onion farmer cry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.