लोकमत ॲग्रो विशेष
देशांतर्गत कांद्याची गरज भागून निर्यातीसाठी अतिरिक्त कांदा उपलब्ध होऊ शकतो असा अंदाज उत्पादन व व्यापार क्षेत्रातील विश्लेषकांनी वर्तविला आहे. त्यामुळे कांद्याची वेळीच निर्यात झाली, तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे. मात्र निर्यात लांबली, तर वाढत्या उन्हामुळे अनेक ठिकाणचा कांदा खराब होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम थेट कांदा दरावर पडण्याची भीती निर्यात क्षेत्रातील जाणकरांनी व्यक्त केली आहे.
यंदा उन्हाळी कांद्याचा हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला तरी कांद्याचे दर १२ ते १३ रुपयांच्या पुढे जाताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे मॉन्सूनचा चांगला अंदाज आणि कांदा उत्पादन कमी होण्याचा अंदाज असे दोन विरोधाभासी अंदाज वर्तवून केंद्र सरकारने ऐन निवडणुकीच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या रोष ओढवून घेतला आहे. तो कमी करायचा असेल, तर तातडीने कांदा निर्यात खुली करून शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगले बाजारभाव मिळवून देणे हा एकमेव पर्याय केंद्र सरकारसमोर आहे.
यंदा होणार अतिरिक्त उत्पादन
देशातील हवामान आणि पिकाची उपलब्धता यावर अंदाज वर्तविणाऱ्या आणि त्याचे विश्लेषण करणाऱ्या क्रॉप वेदर वॉच ग्रुपच्या बैठकीत यंदा देशांतर्गत कांदा गरज भागवून अतिरिक्त कांदा उत्पादन होईल असा अंदाज वर्तविला आहे. त्यातच यंदा चांगला मॉन्सून असणार या हवामान विभागाच्या अंदाजाने कांदा खरीप व लेट खरीपाच्या कांद्याचे उत्पादन चांगले होईल अशी शक्यता वाढली आहे. त्यातून मागच्या वर्षीच्या खरीप हंगामापेक्षा यंदा कांदा लागवडीचे क्षेत्र वाढून ३.५ लाख हेक्टर होणार असून त्यातून ४५ लाख मे. टन कांदा उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. मागच्या खरीपापेक्षा यंदा कांदा उत्पादकता चांगली असणार आहे.
देशात यंदा किती कांदा खपणार?
भारताच्या कृषी मंत्रालय आणि आयसीएआरकडील आकडेवारीचे विश्लेषण आणि हवामान यांचे विश्लेषण करून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार पुढीलप्रमाणे कांद्याची उपलब्धता देशात असेल.
१. एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीत भारतातील कांद्याला अपेक्षित मागणी (निर्यात आणि तोटा वगळता) : 218 लाख टन इतकी असेल. त्यासाठी वर्षासाठी दरडोई वापर अंदाजे 15 किलोग्रॅम आहे, म्हणजे 1.25 किलो दरमहा कांदा वापर गृहित धरलेला आहे.
एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत कांद्याची देशांतर्गत मागणी: 108 लाख मे. टन असणार आहे. तर पुरवठा: 147 लाख टन (ऑक्टोबरसाठी कॅरी फॉरवर्ड: 39 लाख टन) असेल. त्यामुळे या काळात मागणीपेक्षा पुरवठा अधिक होणार आहे. ही उपलब्धता आकडेवारी रब्बी कांद्याच्या साठवणुकीतील वजन कमी होणे, सडणे इत्यादी घटीनंतर देण्यात आलेली आहे.
निर्यात आवश्यकच का?
ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान मागणी: 60 लाख मे. टन व पुरवठा 84 लाख मे. टन असेल. त्यातून कांद्याची अतिरिक्त उपलब्धता 24 लाख टन इतकी असेल असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे भविष्यात स्थानिक बाजारातील कांद्याच्या किंमतींवर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ द्यायचे नसेल, तर डिसेंबर २४ अखेर सुमारे १० ते १५ लाख मे. टन कांदा निर्यात करण्याची आवश्यकता बाजार विश्लेषकांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ‘लोकमत ॲग्रो’कडे बोलून दाखविली आहे.
हे सर्व विश्लेषण आणि अंदाज अचूक ठरले आणि तरीही निर्यात उठवली नाही, तर त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. मागच्या काही काळापासून हवामान बदल, निर्यातीचे धरसोड धोरण आणि बाजारभाव व उत्पादन खर्चातील तफावत यामुळे कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त झाला असून अनेकांनी कांदा लागवड बंद केली आहे. त्यामुळे भविष्यात कांदा आयात करावी लागेल अशी भीती आता कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्त करताना दिसत आहे.