Join us

Onion Export: निर्यात घटल्याने यंदा शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळतोय कमी बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 6:39 PM

Onion export decreased this year resulted in low market price for farmer's onion यंदा हवामान आणि सरकारी धोरण या दोन्हींचा फटका कांद्याच्या निर्यातीला बसला असून सप्टेंबर २४ पर्यंत देशभरातील एकूण कांदा उत्पादनाच्या केवळ अंदाजे दीड टक्काच निर्यात होऊ शकली आहे. गेल्या आर्थिक वर्षात कांद्याची निर्यात सुमारे ९ टक्के होती. निर्यात घटल्यामुळे परकीय चलन घटण्याबरोबरच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सरासरी कांदा बाजारभावही घटल्याचे दिसून येत आहे.

Onion export decreased this year केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त माहितीनुसार यंदा एप्रिल ते ऑगस्ट २४ दरम्यान कांद्याची निर्यात (एच एच कोड: ०७०३१०) ३ लाख ४६ हजार ३२६ मे. टन इतकी झाली आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत म्हणजेच एप्रिल ते ऑगस्ट २०२३ मध्ये याच प्रकारच्या कांद्याची निर्यात ११ लाख ७० हजार २७२ मे. टन इतकी झाली होती. म्हणजेच मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा निर्यात ७० टक्क्यांनी घटली आहे.

न्हावाशेवा बंदरावरून किती झाली निर्यातप्राप्त माहितीनुसार यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये न्हावा शेवा बंदरावरून केवळ २० हजार ५० मे. टन इतकीच कांदा निर्यात होऊ शकली. ऑगस्ट २४ मध्ये ११ हजार ४८ मे. टन, तर सप्टेंबर २४मध्ये ९ हजार १ मे. टन कांदा निर्यात होऊ शकली. मागच्या वर्षी २०२३मध्ये याच बंदरावरून ऑगस्टमध्ये ६० हजार ७३८ मे. टन, तर सप्टेंबरमध्ये २२ हजार ६८४ मे. टन कांदा निर्यात झाला होता.

म्हणून निर्यात कमी झालीटिकवण क्षमता चांगली असलेला उन्हाळी कांदा मार्चपासून बाजारात दाखल होतो. मात्र यंदा उन्हाळी कांदा दाखल होऊनही निर्यातबंदी असल्याने या कांद्याची निर्यात झाली नाही. परिणामी स्थानिक बाजारपेठेत कांद्याचे भाव पडले आणि शेतकऱ्यांना मार्च आणि एप्रिल महिन्यात सरासरी १२०० ते १६०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे कांदा विकावा लागला.

दरम्यान लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा रोष वाढू लागल्याने ४ मे रोजी ५५० डॉलर प्रति टन या निर्यातमूल्याच्या अटीसह आणि ४० टक्के निर्यात शुल्काच्या अटीसह कांदा निर्यात खुली केली. मात्र तोपर्यंत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीनने कांद्याची जागतिक बाजारपेठ काबीज केली होती. परिणामी सुरूवातीच्या तीन महिन्यांत सुमारे दहा ते १२ लाख मे. टनांऐवजी जुलै २४ पर्यंत केवळ अडीच लाख टन निर्यात होऊ शकली. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना कमी बाजारभाव मिळण्यात झाला.

कांदा खराब व्हायला लागल्यावर निर्यातमूल्य हटविले..दरम्यान केंद्र सरकारने अलीकडेच कांद्याच्या निर्यातीवरील किमान निर्यात मूल्याची अट काढून टाकली. मात्र कांद्यावरील निर्यात शुल्क २० टक्के ठेवल्याने त्याचा परिणाम कांदा निर्यातीवर झाल्याचे फलोत्पादन निर्यातदारांच्या संघटनेचे म्हणणे आहे. कांद्याच्या निर्यातीचा हंगाम मार्च ते मे पर्यंत चांगला असतो. या काळात कांद्याचा दर्जा चांगला असल्याने जागतिक बाजारपेठेत त्याला चांगली मागणी असते. मात्र नंतरच्या काळात कांदा खराब व्हायला लागतो.

ऑगस्टनंतर  कांद्याची पात गळणे, काजळी येणे, साठवणुकीतील कांद्याला कोंब येणे असे हवामानशास्त्रीय परिणाम कांद्यावर होत असल्याने वजनात घट येण्याबरोबरच कांद्याची टिकवणक्षमता कमी होत जाते. दुसरीकडे निर्यातशुल्क लावल्याने इतर देशांच्या तुलनेत हा कांदा महाग विकला जातो. परिणामी निर्यातीत घट होते, अशी माहितीही निर्यातदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान केंद्रीय शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या हवाल्याने ग्राहक संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २०२३-२४ या वर्षी देशातील कांदा उत्पादन घटून 254 लाख टन इतके झाले. त्यापैकी आजतागायत सुमारे दीड ते पावणेदोन टक्के इतकीच कांदा निर्यात झाली आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या किंमतीवरही यंदा झालेला दिसून येतोय.

टॅग्स :कांदाबाजारशेतकरी