भारतीय फलोत्पादन निर्यात संघटना अर्थात हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्टर असोसिएशन ऑफ इंडिया (Horticulture produce Exporter association of India) या निर्यातदार संघटनेमध्ये यंदा नाशिकच्या कांद्याला मानाचे स्थान मिळाले आहे. नाशिक स्थित कांदा निर्यातदार विकास सिंग यांची या संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे नाशिकच्या कांदा निर्यातदारांसह उत्पादक शेतकऱ्यांचे मार्केटसंदर्भातील प्रश्न मार्गी लागणे सोपे होणार आहे.
हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्टर असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेची नुकतीच बैठक संपन्न झाली. त्यात नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यात नाशिकच्या कांदा निर्यातदार व्यापारी श्री. सिंग यांची निवड झाली. या संघटनेच्या अध्यक्षपदी के. वेंकटरामन, सचिवपदी अमित कथरानी, सहसचिवपदी ओमप्रकाश राका, खजिनदारपदी मोईन सुलेमान यांची निवड झाली आहे.
देशात सुमारे दीड हजार कांदा निर्यातदार असून त्यात नाशिक जिल्ह्यातील कांदा निर्यातदारांची संख्या मोठी आहे. भारतातून दरवर्षी सुमारे २५ लाख टन मे. टन कांदा निर्यात होते. त्यात महाराष्ट्राचा आणि त्यातही नाशिकचा वाटा मोठा आहे.
मागील वर्षी कांदा निर्यातीवर केंद्राने निर्बंध घातल्यानंतर ती उठविण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींबरोबरच फलोत्पादन निर्यातदार संघटनेनेही सरकार दरबारी बरेच प्रयत्न केले होते. कालांतराने त्याला यश येऊन मे नंतर निर्यात सुरळीत झाली. त्यात नाशिकचे निर्यातदार व आताचे नवनियुक्त उपाध्यक्ष विकास सिंग यांची महत्त्वाची भूमिका राहिली होती.