केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मंगळवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यातील सर्वाधिक ३३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. त्यापाठोपाठ लासलगावला २७०० रुपयांचा दर मिळाल्याचे सांगण्यात आले.
मागील काही दिवसांत कांदा निर्यात बंदीमुळे दरात मोठी घसरण झाली होती. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज सुमारे ८०० ते ९०० ट्रक कांद्याची आवक होत होती. मात्र, दर १००० ते १५०० रुपयांपर्यंतच मिळत होता. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. मागील आठवड्यात कांद्याची आवक कमी झाली. शनिवारी ४२८ ट्रक कांद्याची आवक होती. दर २१०० रुपयांपर्यंत मिळाला होता. सरासरी दर अकराशे रुपये मिळत होता.
कोसळलेला दर हळूहळू वाढत होता. दरम्यान, रविवारी कांदा निर्यात बंदी उठविण्याचा निर्णय झाला. त्यामुळे आता कांद्याला चांगला दर मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. सोमवारी शिवजयंतीनिमित्त लिलाव बंद होता.
रविवार व सोमवार बंद असल्याने मंगळवारी मोठी आवक होईल, असे वाटत होते. मात्र, कांदा निर्यात बंदीचा निर्णय झाला की नाही, याबाबत शेतकऱ्यांच्या मनात संभ्रमावस्था असल्यामुळे शेतकऱ्यांनी मालच आणला नाही. त्यामुळे आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.
केवळ ७८ ट्रक कांद्याची आवक
मंगळवारी केवळ ७८ ट्रक कांद्याची आवक होती. आवक कमी असल्याने दरात मोठी वाढ झाली. शनिवारी २१०० रुपयाला विकलेल्या कांद्याला मंगळवारी ३३०० रुपयांचा दर मिळाला. सरासरी दरातही वाढ झाली असून, १९०० रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त्त होत आहे. आवक कमी असली तरी दर चांगला मिळाल्याने १ कोटी ४८ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.
कांदा निर्यात बंदीचा निर्णय झाल्यामुळे सोलापूर बाजार समितीत दरात मोठी वाढ झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था असल्यामुळे आवक कमी होती. बुधवारपासून आवक वाढण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात आणखी दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. - दत्तात्रय सूर्यवंशी, सचिव, सोलापूर बाजार समिती
डिसेंबर व जानेवारी महिन्यात कांद्याला दर मिळाला. तेव्हाच कांद्याची आवक मोठी होती. आता आवकच कमी झाली आहे. सध्या कमी शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे. त्यामुळे यापूर्वीच निर्यातबंदी उठवली असती तर शेतकऱ्यांना फायदा झाला असता. दोन महिन्यांत विक्री केलेल्या कांद्याला अनुदान देऊन सहकार्य करावे. - शिवपुत्र बिराजदार, शेतकरी