जुलै ते सप्टेंबरपर्यंत १० ते २० रुपये किलो दराने विकला गेलेल्या कांद्याला दसरा होताच सोनेरी दिवस आले आहेत, गुरुवारी येथील ठोक बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा ५० रुपये किलो दराने विकला, साधारण कांद्याला ३८ ते ४० रुपये भाव मिळाला. आवक कमी होत असल्याने दिवाळीला कांद्याचा दर आणखी उजळणार आहे. त्यामुळे दर्जेदार कांदा असणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार आहे. येथील आडत बाजारात नेकनूर, चौसाळा, ईट, पिंपळनेर भागातून कांद्याची आवक होत आहे. याशिवाय अहमदनगर, राहुरी, घोडेगाव भागातून आवक होत आहे.
आष्टी, कड्या फुलणार कांदा
- यंदा पावसाने मेहरबानी केल्याने आष्टी, कडा परिसरातील गावांत तसेच बीड तालुक्यातील नेकनूर, चौसाळा, नांदूरघाट परिसरात कांद्याची लागवड बऱ्यापैकी होण्याचा अंदाज आहे.
- तीन महिन्यांपूर्वी भाव पडल्याने नुकसान झाले असले, तरी शेतकरी यंदा कांदा लागवडीच्या विचारात आहेत. पाणी नसलेल्या भागात मात्र लागवड कमी होण्याचा अंदाज आहे.
तीन महिने घसरले होते भाव
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाळा, चातुर्मासामुळे बाजारात उठाव नव्हता. मागणी कमी व आवक साधारण असल्याने तीन महिने कांदा ८ ते १० रुपये किलो दराने ठोक बाजारात विकला गेला. किरकोळ बाजारात मात्र हा दर १२ ते १५ रुपये किलो होता.