ऐन गणेशोत्सवात कांदा व्यापाऱ्यांनी बाजारसमित्या बंद ठेवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी केली. परिणामी सणासुदीला साठवल्या कांद्याला चार पैसे मिळतील ही शेतकऱ्याची अपेक्षाही फोल ठरली. त्यामुळे बाजारसमित्यातील कांद्याचे लिलाव तातडीने सुरू करावेत अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आज केली आहे.
कांद्यावरील 40टक्के निर्यात शुल्क हटवणे, नाफेड व एनसीसीएफचा कांदा बंद करणे आणि नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनकडून जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद ठेवले आहेत.
याबाबत पुढील रणनीती ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांची आज सोमवार दिनांक २५ सप्टेंबर २३ रोजी सकाळी १० वाजता. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सुरूवातीला शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला आणि तशा घोषणाही देण्यात आल्या.
दिनांक १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी निमित्त सुटी असल्याने बाजारसमितीतील कांदा व्यवहार बंद होते. ठराविक ठिकाणीच या दिवशी व्यवहार झालेत. मात्र त्यानंतर बुधवार दिनांक २० सप्टेंबरपासून कांदा व्यापाऱ्यांनी संप पुकारल्याने कांदा खरेदी बंद राहिली. परिणामी सणासुदीला कांदा विकून चार पैसे हातात येतील ही शेतकऱ्याची अपेक्षा फोल ठरली. दुसरीकडे नाफेडची कांदा खरेदीही अपेक्षित पद्धतीने होत नसून जास्तीचे निकष लावल्याने आणि कमी भाव देत असल्याने शेतकऱ्यांनी तिकडे पाठ फिरवली.
याशिवाय नाफेडची अनेक खरेदी केंद्रही बंद आहेत. या सगळ्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होत असून त्याची परिणीती शेतकऱ्यांच्या नैराश्यात आणि संतापात होत आहे. दोनच दिवसांपूर्वी देवळा तालुक्यातील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने बाजारभाव चांगले नसल्याने आत्महत्या केली होती. मात्र तरीही सरकारने त्याची गंभीर दखल घेतलेली नसून कांदा उत्पादकांकडे दुर्लक्ष केले असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये धुमसत आहे.