Join us

कांद्याचा वांधा: कांदाप्रश्नी हिवाळी अधिवेशनात आज काय झाले?

By मुक्ता सरदेशमुख | Published: December 11, 2023 5:45 PM

शेतकरी जर लिलाव करणार नसतील तर...

कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. परंतु, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी बोलणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नागपूरात आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस होता. यावेळी विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म.नि.प.नियम २८३ अन्वये सूचना मांडली. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशात सध्या कांदा उपलब्ध आहे. निर्यातीसाठी परवानगी दिल्यास अडचण निर्माण होईल. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी सरकार कांदा खरेदी करण्यास तयार आहे. केंद्र सरकारने कांद्यावर ७ डिसेंबर रोजी अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्यामुळे कांद्याच्या दरात निम्यापेक्षा अधिक घसरण झाली.एका दिवसात शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.

कांदा लिलाव सुरु, आजच्या बाजारभावाकडे लक्ष 

हिवाळी अधिवेशनानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याशी भेट घेऊन त्यांना निर्यात पुन्हा सुरु करण्याची विनंती केली आहे. त्यावेळी ते म्हणाले की, देशात लागणाऱ्या कांद्यापैकी २५ ते ३० टक्के कमी कांद्याचा साठा आहे. अशा काळात जर आपण निर्यात पुन्हा सुरू केली तर मोठ्या प्रमाणात कांदा टंचाई निर्माण होईल. सामान्यांना कांदा परवडणार नाही. त्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांच्या नुकसानावर पर्याय काय?

जेवढा कांदा शेतकरी देतील तेवढा कांदा जो भाव ठरेल त्या भावाने सरकार घेण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले आहे. जर शेतकरी लिलाव करणार नसतील तर सगळा कांदा केंद्र सरकारच्या वतीने राज्य सरकार खरेदी करेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नवीन कांदा बाजारात येत आहे. जूना कांदा आता शेतकऱ्यांकडे नाही. जोपर्यंत निर्यातबंदीवर निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. कांदा खरेदी होणार नसेल, लिलाव होणार नसतील तर केंद्राकडून सगळा कांदा खरेदी करण्यात येईल.

पहा नक्की काय झाले?

निर्यातबंदी मागे घेतली तर कांद्याचा मोठा तुटवडा निर्माण होणार आहे. केंद्र सरकारला याबाबत मार्ग काढण्याची विनंती केली आहे. कांद्याच्या प्रश्नावर केंद्रीय वाणिज्य मंत्री  @PiyushGoyal यांच्याशी चर्चा केली असल्याचे उपमुख्यमंत्री  @Dev_Fadnavis यांनी सांगितले आहे. पहा येथेhttps://twitter.com/MahaDGIPR/status/1734172883407061196?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Eembeddedtimeline%7Ctwterm%5Escreen-name%3AMahaDGIPR%7Ctwcon%5Es1

 

टॅग्स :कांदाविधानसभा हिवाळी अधिवेशनदेवेंद्र फडणवीसबाजारमार्केट यार्ड