कांद्याची लासलगाव (पिंपळगाव) बाजारातील मागील सप्ताहातील सरासरी किंमत रु.२१०१ प्रती क्विंटल अशी आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या किंमतीत सरासरी ५ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले, तर आवक मात्र ३१.४ टक्क्यांनी घटल्याने दिसून आले. दरम्यान पुढील दोन महिन्यासाठी कांदाबाजारभाव काय असेल, याचे भाकीत वर्तविण्यात आले आहे.
राज्याच्या कृषी विभागाच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पाच्या अंतर्गत पुणे येथे बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्ष कार्यरत आहे. तेथील तज्ज्ञांमार्फत दर आठवड्याला निवडक पिकांच्या बाजारभाव अहवाल आणि दर महिन्याला निवडक पिकांचे संभाव्य बाजारभाव प्रसिद्ध केले जातात. नुकतेच या कक्षाने पुढील दोन महिन्यांच्या कांदा बाजारभावांचे भाकीत आपल्या अहवालात वर्तविले आहे.
शेतमालाच्या संभाव्य किंमतींचा अंदाज
कांदा (ॲलियम सेपा एल) हे भारतातील विविध भागांमध्ये घेतले जाणारे एक महत्त्वाचे व्यावसायिक भाजीपाला पिक आहे. कांदा भारतीय आहारातील सर्वात महत्त्वाच्या वस्तूंपैकी एक आहे. लोकसंख्या वाढीमुळे कांद्याचा वापर वाढत आहे. कांदा पिक नाशवंत असल्याने किमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार होताना दिसून येतात. भारत हा जगातील दुसरा क्रमांकाचा कांदा उत्पादक देश असून एकूण जागतिक उत्पादनात २०% वाटा आहे (FAO, २०२०).
भारतात खरीप व रब्बी हंगामात कांद्याचे उत्पादन घेतले जाते.खरीप आणि लेट खरीप हंगामातील मिळून उत्पादनाचा एकूण कांद्याच्या उत्पादनात सुमारे ६० टक्के वाटा आहे. खरीप हंगामातील उत्पादन ऑक्टोबर ते जानेवारी या महिन्यात बाजारात येते. रब्बी कांदा पिकाची विक्री एप्रिल ते जून दरम्यान केली जाते.
सन २०२२-२३ मध्ये कांद्याची निर्यात मागील वर्षाच्या तुलनेत ६४ टक्केनी अधिक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी (२०२२-२३) भारतात कांद्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. मागील वर्षी ३१६.८७ लाख टन उत्पादन झाले होते. सन २०२२-२३ मध्ये ३१०.०५ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली आहे. ॲगमार्कनेटकडील स्त्रोतानुसार मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षात कांद्याची मासिक आवक जास्त आहे.
सन २०२२-२३ मध्ये महाराष्ट्रात कांद्याचे १२०.३२ लाख टन होण्याची शक्यता वर्तवली आहे. मागील वर्षी सन २०२१ २२ मध्ये १३६.६८ लाख टन कांदा उत्पादन झाले होते. (स्रोत: फलोत्पादन संचालनालय, GoM).
चालू वर्षी कांद्याच्या किंमती या मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. मागील तीन वर्षातील ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यातील सरासरी किमती खालील प्रमाणे होत्या.
ऑक्टो ते डिसें. २०२० रु. ३१५३रु. प्रती क्विंटल
ऑक्टो ते डिसें. २०२१ रु. २३२१ प्रती क्विटल
ऑक्टो ते डिसे. २०२२ रु. १८५४ प्रती क्विंटल.
यावरून लासलगाव बाजारासाठीच्या संभाव्य किमतींचा अंदाज पुढील प्रमाणे वर्तविण्यात आलेला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ : रु. २००० ते ३००० प्रति क्विंटल.
(महत्त्वाची सूचना : सदर अहवाल हा बाजाराची सद्यस्थिती व भविष्यकालीन किंमतीविषयक अनुमान दर्शिवितो. आंतरराष्ट्रीय किंमती, हवामान, आर्थिक घटक, आणि सरकारी धोरण यामध्ये होणाऱ्या बदलामुळे संभाव्य किंमतीमध्ये बदल होऊ शकतो. परिणामी वास्तविक किंमती या संभाव्य किंमती पेक्षा वेगळ्या असू शकतात. त्यामुळे वाचकांनी या अहवालाचा काळजीपूर्वक व आपल्या जबाबदारीने वापर करावा.)
अधिक माहितीसाठी संपर्क:
बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्ष, पुणे
मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प
एम.एस.एफ.सी बिल्डींग, २७० भाम्बुर्डा, नारायण एस. बी. मार्ग,
सिंबायोसिस कॉलेज, गोखले नगर, पुणे ४११०१६
फोन: ०२० - २५६५६५७७, टोल फ्री: १८०० २१० १७७०, ई-मेल: mirmc.smart@gmail.com