Red Onion Price: दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारसमित्यांमध्ये खरीपातील लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे. सध्या ही आवक अगदी २० ते १०० क्विंटलपर्यंत मर्यादित असली, तरी हळूहळू ती वाढत जाणार आहे.
सध्या बाजारात आलेल्या लाल कांद्याला सरासरी २५०० रुपयांचा भाव मिळताना दिसत असून येत्या १५ दिवसांत लाल कांद्याची नियमित आवक बाजारसमितीत खऱ्या अर्थाने सुरू होईल असा कांदा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांकडील साठवलेला उन्हाळी कांदा आता जवळपास संपला असून व्यापाऱ्यांच्या चाळींतही उन्हाळी कांदा अत्यल्प शिल्लक आहे.
परिणामी कांद्याचे बाजारभाव टिकून राहिले असून दिवाळीपर्यंत तरी बाजाराचा हाच कल टिकून राहील असा अंदाज व्यापाऱ्यांनी आणि या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
येत्या पंधरा दिवसात लाल कांदा बाजारात आल्यावर त्याची मागणी वाढणार असल्याने सुरूवातीचे काही दिवस मागणी आणि पुरवठ्याच्या गणितानुसार लाल कांद्यात तेजी असणार आहे. अलीकडे झालेल्या परतीच्या पावसाने राज्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले असून कांद्यालाही त्याचा फटका बसला आहे. परिणामी अनेक भागातील खरीपाचा कांदा खराब झाला आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे कांदा बाजारात उशिरा दाखल होऊ शकतो असा व्यापाऱ्यांचा होरा आहे. दुसरीकडे कर्नाटककडील कांदा अजूनही बाजारात नियमित आलेला नाही. ही आवक सुरू झाल्यावरच त्याचा परिणाम कांदा बाजारभावांवर होण्याची शक्यता आहे.