दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर उन्हाळी कांदाबाजारात विक्रीसाठी येत असला, तरी कांदा शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. शेतकऱ्यांकडे आता उन्हाळी कांद्याचा अत्यल्प साठा शिल्लक असून बाजारसमित्यांमधील उन्हाळी कांद्याची आवक आता घटताना दिसत आहे. परिणामी मागच्या आठवड्यापासून बाजारसमित्यांमधील कांद्याच्या कमीत कमी आणि सरासरी भावात सुमारे २० ते २५ टक्के वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर उन्हाळी कांद्याच्या दराचे सीमोल्लंघन पाहायला मिळणार असून नवीन कांदा बाजारात येईपर्यंत कांद्याचे भाव टिकून राहण्याची शक्तता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.
सोमवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी लासलगाव बाजारसमितीत उन्हाळी कांद्याला कमीत कमी १८०० तर सरासरी ३९५० रुपये प्रति क्विंटल, तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कमीत कमी २ हजार तर सरासरी ३९०० रुपये प्रति क्विंटल असे बाजार भाव होते. मागच्या सोमवारी म्हणजेच १६ ऑक्टोबर रोजी लासलगाव बाजारसमितीत उन्हाळी कांद्याचे कमीत कमी दर १२०० रुपये, तर सरासरी दर ३ हजार रुपये प्रति क्विंटल असे होते. याच दिवशी पिंपळगाव बाजारसमितीत कांद्याचे कमीत कमी दर १३०० तर सरासरी दर २८५०रुपये प्रति क्विंटल असे होते.
मागच्या आठवड्यात लासलगाव बाजार समितीत कांद्याची सुमारे ८ क्विंटल, विंचूर बाजारसमितीतही ८ हजार क्विंटल, तर पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत सुमारे १२ हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होत होती. ती या आठवड्यात कमी होऊन लासलगाव बाजारसमितीत सुमारे ५ ते ६ हजार क्विंटल, विंचूर बाजारसमितीत सुमारे ५ हजार क्विंटल, तर पिंपळगाव बाजारसमितीत सरासरी ८ हजार क्विंटल अशी आवक दैनंदिन आवक आहे.
एका बाजूला उन्हाळी कांद्याची घटती आवक, तर दुसरीकडे उशिरा आलेला पाऊस आणि मध्यंतरी पडलेला पावसाचा खंड अशा विविध कारणामुळे लाल कांद्याला बाजारात यायला अजूनही वेळ आहे. शिवाय या कांद्याचे उत्पादनही यंदाच्या विपरीत हवामान स्थितीमुळे कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस बाजारसमित्यांमध्ये कांद्याचा बाजार गरम राहण्याची शक्यता आहे. परिणामी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात येणाऱ्या उन्हाळ कांद्याला चांगले दर मिळण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
खराब हवामानामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांकडचा उन्हाळी कांदा खराब झाला. त्यातच सतत बदलत्या सरकारी धोरणांमुळे कांदा बाजारात अस्थिरता निर्माण झाली. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात कांदा बाजारात विकून टाकल्याने शेतकऱ्यांकडील उन्हाळी कांदा आता संपत आलेला आहे. त्यामुळे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कांदा बाजारभाव जरी चांगले मिळत असले, तरी त्याचा फायदा बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांनाच होणार आहे. आता शेतकऱ्यांची मदार सोयाबीनच्या विक्रीतून येणाऱ्या उत्पन्नावरच अवलंबून असेल.
-भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना