उमराणे : सद्यस्थितीत बाजारात येत असलेल्या नवीन लाल कांद्याची प्रतवारी सुधारल्याने मागणीत वाढ होऊन नाशिक जिल्ह्यातील खारी फाटा (ता. देवळा) येथील रामेश्वर कृषी मार्केटमध्ये लाल कांद्याला चालू हंगामातील सर्वोच्च असा ७ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
परतीच्या पावसानंतर उशिरा लागवड केलेल्या कांद्याला महिनाभरापासून पोषक असे वातावरण मिळाल्याने तसेच गेल्या पंधरा दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याने कांदा पीक पुन्हा जोमात आले आहे. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा काढणीला सुरुवात केली असून हा कांदा बाजारात विक्रीस येत असल्याने बाजार समित्यांमध्ये या कांद्याची आवक वाढली आहे.
आवक असतानाही विविध राज्यांमध्ये मागणी वाढल्याने लाल कांद्याच्या दरात वाढ होत आहे. मागील आठवड्यात लाल कांद्याला सर्वोच्च असा ६,७११ रुपये प्रतिक्विंटल दर मिळला होता. परंतु चालू आठवड्यात पुन्हा तीनशे रुपयांची वाढ होत लाल कांद्याला रामेश्वर मार्केटमध्ये मंगळवारी (दि. २६) चालू हंगामातील सर्वोच्च ७ हजार प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
गेल्या आठवड्याभरापासून बाजारात येत असलेल्या लाल कांद्याची प्रतवारी सुधारली असून या कांद्यास चकाकी वाढली आहे. हा कांदा निर्यातक्षम असल्याने मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये विक्रीस आलेल्या चांगल्या प्रतीच्या कांद्याला व्यापाऱ्यांकडून चांगला दर मिळत आहे. - पंकज ओस्तवाल, कांदा व्यापारी.
आवक आणि बाजारभाव
बाजार आवारात ९३५ ट्रॅक्टर व पिकअप वाहनांमधून सुमारे १२,००० क्विंटल आवक झाल्याचा अंदाज असून त्यांचे बाजारभाव किमान १,५०० रुपये, कमाल ७,००१ रुपये तर सरासरी ३,५०० रुपयांपर्यंत होते.
हेही वाचा : Bajari Health Benefits : हिवाळ्यात बाजरी खाण्याचे विविध आरोग्यदायी फायदे