Join us

कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक: आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार, रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा

By पंकज प्रकाश जोशी | Published: February 28, 2024 2:01 PM

कांदा निर्यातीसंदर्भात मागच्या आठवड्यात सरकारी पातळीवर बराच गोंधळ उडाला. पण आता निर्यातबंदी घातली काय किंवा काढली काय? त्यामुळे आगामी काळात कांद्याच्या किंमतींवर परिणाम होण्याची शक्यता कमी असून त्या स्थिर राहून हळूहळ वाढण्याची शक्यता बाजार विश्लेषकांकडून वर्तविण्यात येत आहे.

राज्यातील बाजारसमित्यांमधील कांद्याची आवक मागच्या दोन आठवड्यांपासून घटताना दिसत असून देशपातळीवरील कांदा आवक २० टक्क्यांनी घटली असल्याचे निरीक्षण स्मार्ट प्रकल्पांतर्गत बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्ष, पुणे येथील तज्ज्ञांनी साप्ताहिक अहवालात नोंदविली आहे.

असे आहे आवकेचे गणितमहाराष्ट्र राज्य पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार दोन आठवड्यापूर्वी शनिवार-रविवार वगळता राज्यातील बाजारसमित्यांतील एकूण कांदा आवक ही ३.२५ ते ३.८० लाख क्विंटल होती. मागील आठवड्यात त्यात घट होऊन ती २.२० ते २.८० लाख क्विंटलवर आली. या आठवड्यात सोमवारी बाजारसमिती संपामुळे मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी कांदा आवक जास्त होऊन ती ३.६० लाख क्विंटल अशी होती. असे असले तरी लाल कांद्याचा हंगाम आता केवळ १५ दिवसच राहणार असल्याने आगामी काळात ही आवक कमी होईल अशी माहिती

लासलगाव-पिंपळगाव बाजार समितीकडून सांगण्यात आली आहे. राज्यातील कांदा आवक कमी झालेली असली, तरी नाशिकमधील लासलगाव-पिंपळगाव बाजारसमित्यांमधील कांदा आवक अजून तरी टिकून राहिल असा अंदाज कांदा व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.

कमी पाऊसाने उन्हाळी कांदा कमी? यंदा चांदवड, देवळा, मालेगाव, येवला, मनमाड, कळवण या परिसरात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने येथील कांदा लागवड काही प्रमाणात घटली आहे. त्यामुळे लेट खरीप किंवा रांगडा कांद्याचा हंगाम संपल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातला कांदा संपणार आहे. यापार्श्वभूमीवर नवीन कांदा, म्हणजेच गावठी किंवा उन्हाळी साधारणत: १५ मार्च पर्यंत बाजारसमित्यांमध्ये चांगल्या प्रमाणात यायला सुरूवात होईल. दरम्यान काल २७ फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्ह्यात ३०० क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. सरासरी १६०० रुपयांच्या आसपास बाजारभाव मिळाला. तर लाल कांद्याला साधारणपणे सरासरी १६५० रुपयांचा बाजारभाव मिळाला.

उन्हाळी कांदा हे साठवणुकीचे पीक असल्याने अनेक शेतकरी हा कांदा साठवण करून आवश्यकता पडेल, तसा बाजारात आणतात. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कांदा चाळी आहेत, किंवा साठवणुकीची चांगली सोय आहे, ते शेतकरी सर्वप्रथम चाळीत कांदा साठवतील, त्यानंतर उरलेला कांदा बाजारात आणतील. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव टिकून राहतील, तसेच वाढण्याचीही शक्यता बाजारसमितीकडून वर्तविण्यात येत आहे.

भविष्यात कांदा वधारण्याची शक्यता पुणे येथील बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्षाने वर्तविलेल्या साप्ताहिक अहवाल व अंदाजानुसार येणाऱ्या काळात देशात कांद्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. नाशिकमधील बाजारसमित्यांमध्येही कांदा सध्या कांद्याचे दर वाढत असून येणाऱ्या काळात ते वाढण्याची आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान कांदा दराबाबत बोलताना नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर काही कांदा व्यापारी आणि निर्यातदारांनी सांगितले की देशातील अंतर्गत गरज वाढत असल्याने व दुसरीकडे हंगामातला लाल कांदा आवक कमी होत असल्याने कांदा बाजारभाव तीन आठड्यापासून १०० ते १५० रुपयांनी वाढले व नंतर स्थिरावले होते. निर्यातबंदी उठवली नसती, तरीही कांदा बाजारभाव वाढलेच असते. मात्र जर पूर्णपणे निर्यातबंदी हटवली, तर कांदा बाजारभावापोटी शेतकऱ्याला साधारणत: अडीच ते ३ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला असता. आताही नवीन शेतकऱ्यांना दोन ते अडीच हजारांच्या आसपास कांदा बाजारभाव मिळू शकतो. या बद्दल मार्चमधील आवकेनंतरच चित्र स्पष्ट होईल.

उन्हाळ कांद्याच्या आवक बाजारसमितीत थोड्या प्रमाणात सुरू झाली असून आज बुधवारी सकाळी २५ नग आवक झाली. त्याचे बाजारभाव सरासरी १८००पर्यंत मिळत आहेत. १५ मार्चनंतर उन्हाळी कांदा बाजारात नियमित दाखल होईल. - महेश धामणे, प्रभारी सहसचिव, लासलगाव उपबाजारसमिती, विंचूर

पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत मागील आठवड्यापेक्षा कांद्याचे बाजारभाव सुमारे ३०० रुपयांनी वाढलेले आहेत. लेट खरीप कांद्याची आवक १५ मार्चपर्यंत सुरू राहिल त्यानंतर उन्हाळी कांद्याची आवक वाढून कांदा आवक वाढत जाईल. संजय लोंढे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत

दि.२८/०२/२०२४ विंचूर उप-बाजार समितीचे पहिल्या सत्रात झालेले एकूण कांदा लिलाव : ७४८ नग

आवकउन्हाळा कांदा -२९लाल कांदा - ७१९लाल कांदा बाजारभाव (रु. प्रति क्विं.)क.क.   - ५००जा. जा. -१९०१स.सा. -  १७५०  उन्हाळा कांदा बाजारभावक.क.- ८५२जा.जा.- १८२६स. स.-   १६५०  

टॅग्स :कांदापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजारशेतकरी