Join us

कांदा बाजारभाव; जागतिक बाजारपेठेत पाकिस्तानचा कांदा.. निर्यातबंदीने केलाय आमचा वांदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2024 11:03 AM

भारत कांद्याच्या जागतिक बाजारपेठेतून बाहेर पडल्यामुळे मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका, दुबई आणि इतर पारंपरिक भारतीय कांद्याची जागतिक बाजारपेठ धोक्यात आल्याने बाजारपेठांमध्ये पाकिस्तान सुमारे ३४ ते ४५ रुपये प्रति किलो दराने कांदा विकत आहे. त्यापाठोपाठ चीनही संधीचा फायदा घेत आहे.

कांद्याची निर्यात करणारा भारत हा जगातील सर्वांत मोठा देश आहे. मात्र, भारताच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाने पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होऊ लागल्याने भारतावर हक्काची बाजारपेठ गमविण्याची वेळ आली आहे. कांदा आठशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलवर आला आहे. कांद्याचे भाव आठशे रुपयांवर आले आहेत. शेतमाल आयात-निर्यातीमध्ये दीर्घकालीन धोरण नसल्याने जागतिक बाजारपेठेत विश्वासार्हता ढासळू लागल्याची टीका विरोधक आणि शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

भारत कांद्याच्या जागतिक बाजारपेठेतून बाहेर पडल्यामुळे मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका, दुबई आणि इतर पारंपरिक भारतीय कांद्याची जागतिक बाजारपेठ धोक्यात आल्याने बाजारपेठांमध्ये पाकिस्तान सुमारे ३४ ते ४५ रुपये प्रति किलो दराने कांदा विकत आहे. त्यापाठोपाठ चीनही संधीचा फायदा घेत आहे. पाकिस्तानी कांद्याची गुणवत्ता भारतीय कांद्याच्या तुलनेत ६० ते ८० टक्के इतकीच आहे.

भारतीय कांद्यावर अशीच निर्यातबंदी राहिली तर पाकिस्तान जादा दराने कांदा विकत आहे आणि याचा भारतीय शेतकऱ्यांना फटका बसत आहे. पुढील हंगामात केवळ पाकिस्तानातच नव्हे, तर चीन आणि तुर्कीमध्येही बंपर कांदा उत्पादन येणे अपेक्षित आहे. त्यातच भारतीय कांदा जागतिक बाजारात नसल्याने त्याचा फायदा हे देश उठवू शकतात. शिवाय भारतीय कांद्याची बाजारपेठ या देशांनी एकदा काबीज केली की नंतर भारतीय उत्पादकांना त्याचा मोठा फटका बसण्याचा धोका आहे.

सरकारी हस्तक्षेपामुळे भारतीय कांदा व्यवसायाला फटका बसत असून आपल्या सर्व पारंपरिक बाजारपेठा पाकिस्तान आणि चीन काबीज करत आहे. अनेक देशांतून भारतीय कांद्याला मागणी आहे. मात्र, निर्यातबंदीच्या निर्णयामुळे पाक, चीनमधून कांदा खरेदी करावा लागत आहे.

सरकार कांद्याबाबत इतके दक्ष का?■ यावर्षी लोकसभा निवडणुका होणार असल्याने केंद्र सरकार कांद्याबाबत अत्यंत दक्ष आहे. सरकारला कांदा पिकवणाऱ्या बरोबर खाणाऱ्याचा पण विचार करायचा आहे. मात्र, आगामी निवडणुकीत फटका बसू नये, याची काळजी घेताना केंद्र सरकार दिसत असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी सांगत आहेत.■ महाराष्ट्राप्रमाणे मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि राजस्थान ही कांदा उत्पादक राज्ये आहेत. केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०२३ रोजी निर्यातबंदीनंतर देशांतर्गत बाजारपेठेत एका महिन्यात कांद्याची किंमत ८ ते १० रुपये प्रति किलोपर्यंत घसरली आहे. परिणामी, कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

कांदा दरातील घसरण सुरूच■ प्रजासत्ताक दिनाच्या सुटीनंतर खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले उपबाजारात बुधवार (दि.३१) ला कांद्याची आवक तीन हजार क्विंटल झाली.■ कांद्याला आठशे ते पंधराशे रुपये प्रति क्चिटलवर आला आहे. अशी माहिती बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंदे यांनी दिली.■ चाकण येथील रब्बी हंगामातील गरवा जातीचा कांदा हा टिकाऊ व फिक्कट लाल, उग्र वासाचा, टिकाऊ असल्याने त्याला निर्यातदार कंपन्यांची मोठी मागणी असते. अनेक निर्यातदार कंपन्या चाकणचा कांदा निर्यातीसाठी खरेदी करतात.■ राज्यात चाकण येथे मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक येथील व्यापारी कांदा खरेदी करण्यासाठी येतात. निर्यात बंदी असल्याने व्यापारी, निर्यातदार कंपन्या, चाकण बाजारात आलेल्या नाहीत.

कांदा सडलागेल्या दोन महिन्यांपासून निर्यातबंदीमुळे कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. शंभर रुपये किलोवर गेलेला कांदा आता अवघ्या ८ रुपयांवर आला आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात कांदा उपलब्ध आहे. मात्र भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. साठवलेला कांदा सडू लागला आहे.

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डपाकिस्तानचीनशेतकरीशेतीपीक