मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्हयासह राज्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे कांदा, (Onion Yield) द्राक्ष अशा फळबाग पिकांसह काढणीला आलेल्या कापूस आणि सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आलेला आहे. दरम्यान मागच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने कांद्याचे उत्पादन कमी झाले होते. यंदा अतिपावसामुळे कांदा पीक हातातून जाणार असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात तीनही हंगामातील कांदा लागवड केली जाते. या शिवाय चांडवड, येवला, निफाड आणि सिन्नर हे तालुके कांदा लागवडीत आघाडीवर आहेत. मागील आठवड्यापासून या सर्वच कांदा पट्ट्याला कमी अधिक प्रमाणात परतीच्या पावसाने झोडपल्याने येथील कांद्याचे नुकसान झाले आहे.
तीनही हंगामातील पिकांचे नुकसान
नुकसानीत अर्ली खरीप म्हणजेच काढणीवर आलेला पोळ कांदा, शेतात नुकताच महिनाभरापूर्वी लागवड झालेला रांगडा कांदा म्हणजेच लेट खरीप कांदा आणि उन्हाळी कांदा यांचे नुकसान झाले आहे. मागच्या वर्षी दुष्काळी स्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांना घरचे कांदा बियाणे तयार करता आले नाही. यंदा या शेतकऱ्यांनी मोठी रक्कम मोजून कांदा बियाणे खरेदी केले. मात्र या आठवड्यात ज्यांनी रोपांसाठी बियाणे पेरले त्यांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. तर काही शेतकऱ्यांचे कांदा रोपांचे पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने त्यांना लागवडीसाठी पुन्हा दुसऱ्यांना खर्च करावा लागेल.
रोगांचेही प्राबल्य वाढणार
पावसामुळे कांद्यावर रोगांचे प्राबल्य वाढणार आहे. करपा, पांढऱ्या मुळीची कुज असे नुकसानीचे प्रकार आगामी काळात शेतकऱ्यांना सहन करावे लागतील. त्यासाठी त्यांना औषध आणि खतांच्या मात्रांचा खर्चही जास्त येणार आहे. तर अनेकांचा काढणीवर आलेला कांदा पावसामुळे खराब झाल्याने, वजनात घट येणे, कांद्याचे आवरण सडणे अशा समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागेल. परिरणामी बाजारात त्यांना भाव कमी मिळण्याची शक्यता आहे. इतकेच नाही, तर कांद्याच्या उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाऊसमान चांगले असल्याने कांद्याची लागवड वाढली आहे. परतीच्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. मात्र एकूणच कांदा उत्पादनाचा विचार करता लागवड वाढल्याने, नुकसान जरी झाले, तरी यंदा कांदा उत्पादनाची सरासरी गाठू शकेल असा आमचा अंदाज आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांनी तातडीने कृषी विभागाकडे संपर्क साधून पंचनामे करून घ्यावेत असे आवाहन संघटनेतर्फे करत आहोत.
-भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना