गेल्या दोन आठवड्यापासून शेतकऱ्यांकडील उन्हाळी कांद्याचा साठा संपत आलेला असून खराब मॉन्सूनमुळे नवीन लाल कांदा अजून हव्या त्या प्रमाणात बाजारात आलेला नाही. त्यामुळे बाजारसमित्यांमधीलकांदा बाजारभाव वाढत असतानाच, किरकोळ विक्रीचे दरही वाढताना दिसत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने आज कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मोठे पाऊल उचलले आहे.
आता येथून पुढे निर्यात होणाऱ्या कांद्याचे किमान मूल्य दुप्पट करून ८०० अमेरिकन डॉलर केले आहे. यामुळे परदेशी खरेदीदारांना आता पूर्वीच्या ४०० डॉलरच्या तुलनेत दुप्पट किंमतीने कांदा खरेदी करावा लागणार आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या विदेशी व्यापार-व्यवहार विभागाने हा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार २९ ऑक्टोबर २३ ते ३१ डिसेंबर २३ पर्यंत कांदा निर्यातीवर ८०० रुपये किमान विक्री मूल्याची मर्यादा लागू राहणार आहे. या निर्णयातून बंगळूरू रेड रोज, तसेच कृष्णपुरम या वाणाचा कांदा वगळण्यात आला आहे. दरम्यान या निर्णयानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्या तरी या या निर्णयामुळे कांदा बाजारभावावर काहीही परिणाम होणार नाही, असे या क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत. दुसरीकडे ही एक प्रकारची अप्रत्यक्ष कांदा निर्यातबंदी असल्याचे शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.
कांदा उत्पादन घटले
यंदाच्या खरीपात उशिरा सुरू झालेला मॉन्सून व पावसाचा सुमारे २१ दिवसांचा पडलेला खंड यामुळे लाल कांद्याची लागवड उशिरा झाली. तर काही शेतकऱ्यांनी कांदा लागवड न करता सोयाबीन, बाजरी, ज्वारी, मका या पिकांना पसंती दिली. त्याचा परिणाम कांदा उत्पादन घटण्यावर होत आहे. शिवाय ज्यांनी कांदा लागवड उशिरा केली तो लाल कांदा अजूनही बाजारात येण्यास सुरूवात झालेली नाही.
निर्यातीतही घट; उन्हाळी कांदा अत्यल्प
दुसरीकडे उन्हाळी कांद्याचा साठा आता अत्यल्प राहिला असून पंधरा दिवसांपासन लासलगाव व पिंपळगाव बाजारसमितीमधील उन्हाळी कांद्याची आवक सुमारे ३० टक्क्यांपेक्षा जास्त घटली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे कांद्याचे सरासरी दर सुमारे ४ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. तर लाल कांद्याचे सरासरी दर सुमारे ३ ते ४ हजार रुपये प्रति क्विंटल आहे.
याशिवाय मध्यंतरी केंद्र सरकारने निर्यात आटोक्यात ठेवून देशांतर्गत कांदा भाव कमी करण्यासाठी निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले होते. त्याचाही परिणाम कांद्याच्या निर्यातीवर झाला असून तेव्हापासून देशाबाहेरची निर्यात घटली आहे. सध्या निर्यातीचे प्रमाण अतिशय कमी असून वाणिज्य मंत्रालयाने घेतलेल्या या ताज्या निर्णयाचा शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बाजारभावावर सध्या तरी काहीही परिणाम होणार नाही असे कांदा व्यापारी सांगत आहेत.
नाफेडकडील कांदा आला लवकर बाजारातसामान्यांना शेतमालाचे दर परडवावे यासाठी नाफेडसारखी संस्था कांद्यासारख्या उत्पादनाची खरेदी करून त्याचा स्टॉक करून ठेवते. मात्र नाफेडने ही खरेदी उशिरा सुरू केली. तसेच कांदा लवकर बाजारात आणण्याची घाईही केली. त्यामुळे नाफेडकडे आता कांदा पुरेसा नसल्याचा दावा शेतकरी व व्यापारी प्रतिनिधींनी केला आहे. परिणामी कांदा बाजारात अजून एक महिना तरी भाव खाणार असे लासलगाव येथील काही कांदा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
नाफेडकडेहीआता पुरेसा कांदा शिल्लक नाही, त्यामुळे केंद्र सरकारने कितीही निर्बंध आणले तरी कांदा भाव खाणार असून कांदा उत्पादकांनी घाबरून किंवा गोंधळून जाऊ नये. तसेच एकदम कांदा बाजारात आणू नये. येणाऱ्या काळात भाव वाढतेच राहणार आहेत.- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना