Join us

कांद्याच्या दरात घसरण सुरुच! सलग तिसऱ्या दिवशी असे आहेत भाव..

By मुक्ता सरदेशमुख | Published: December 22, 2023 6:00 PM

उन्हाळी कांदा अत्यल्प...

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर सलग तिसऱ्या आठवड्यात कांद्याच्या दरात घसरण सुरुच आहे. त्यातही मागील तीन दिवसात हा दर सुमारे १० टक्क्यांनी घसरल्याचे दिसून येत आहे. लासलगाव- विंचूर बाजारसमितीत क्विंटलमागे १८०० रुपये मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा तोट्यात व्यवहार करावा लागत आहे. लासलगाव बाजारसमितीत सलग तिसऱ्या दिवशी झालेली ही घसरण आहे. सोमवारी १८ डिसेंबर रोजी कांद्याला मिळणारा भाव प्रतिक्विंटल २१०० रुपये होता. आता हा भाव पुन्हा घसरून १८५० रुपयांवर येऊन थांबला आहे. साधारण १० टक्क्यांनी हा दर घसरला आहे. 

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार गेल्या १५ दिवसात कांद्याच्या भावात साधारण ५० टक्क्यांची घट झाली आहे. सध्या लासलगाव- विंचूर बाजारसमितीत १०,५०० क्विंटल लाल कांद्याची आवक होत आहे. मात्र, मागणी कमी असल्याने कांद्याच्या सरासरी घाऊक बाजारात किंमत घसरली आहे.

कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीमुळे शेतकरी नाराज होते. आता पुन्हा एकदा कांद्याच्या भावात घट झाल्याने किलोमागे २० ते २५ रुपये भाव मिळत आहे.

उन्हाळी कांदा आता अत्यल्प- दरम्यान आज सकाळी लासलगावच्या विंचूर उपबाजारसमितीत झालेल्या कांदा लिलावांत लाल कांद्याला कमीत कमी 1 हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला, तर सरासरी केवळ 1900 रुपये दर मिळाला.पोळ कांद्याला पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत कमीत कमी 1 हजार रुपये दर मिळाला. उन्हाळी कांद्याची आवक आता बाजारसमित्यांमधून जवळपास घटत चालली असून दिवसाकाठी अवघे दीडशे ते दोनशे क्विटल उन्हाळी कांदा बाजारसमित्यांत दाखल होत आहे.

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्ड