श्रीरामपूर : येथील बाजार समितीमध्ये सोमवारी मोकळ्या कांद्याचे दर लिलावामध्ये पाडल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केला. त्यामुळे मंगळवारी सकाळी बाजार समितीतील लिलाव काही वेळ बंद ठेवण्यात आले.
जिल्ह्यातील इतर समित्यांमधील बाजारभावाची माहिती घेऊन उशिराने लिलाव सुरू करण्यात आले. बाजार समितीत कांद्याचे दर १००० ते ११०० रुपये क्विंटलवर राहिले तर शेतकऱ्यांचा खर्चही त्यातून वसूल होणार नाही, असा आरोप शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केला आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी समितीचे सचिव साहेबराव वाबळे यांच्याशी मंगळवारी चर्चा केली. सोमवारी कांद्याचे दर ९०० ते १००० रुपये क्विंटलपर्यंत पडले.
शेतकऱ्यांना क्विंटलमागे १००० रुपये उत्पादन खर्च होतो. त्यामुळे या बाजारभावातून शेतकऱ्यांना कोणताही लाभ होणार नाही. समितीमध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे संचालक मंडळ कार्यरत आहे.
किमान दोन हजार रुपये क्विंटल दर मिळेपर्यंत लिलाव घेऊ नये, लिलाव बंद ठेवण्यात यावे, अशी मागणी औताडे यांनी केली.
जिल्ह्यातील इतर बाजार समितीमध्ये लिलाव प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्याची माहिती घेण्यात आली. सचिव साहेबराव वाबळे यांनी सर्व समितीतील सचिवांशी संपर्क साधला.
तेथील कांद्याच्या दराची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर व्यापाऱ्यांना तेथील बाजारभावाबाबत अवगत केले. अखेर साडेअकरा वाजता लिलाव सुरू झाला.
अधिक वाचा: नवीन कायद्यामुळे ऊस तोडणी मजुरांकडून होणारी लूट थांबणार; जाणून घ्या सविस्तर