Onion Scam, Rotton onion in market by Nafed and NCCF: भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत खरेदी केला चांगला कांदा, पण ग्राहकांना मात्र पाठवला जातोय, खराब झालेला, लहान आकाराचा कांदा.. याबाबत काही शेतकऱ्यांनी आज निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे रेल्वे स्टेशनवरील मालधक्क्यावर धडक देऊन पोलखोल केली असून याबाबतचा व्हिडिओ ‘लोकमत ॲग्रो’च्या हाती लागला आहे.
या व्हिडिओमध्ये रेल्वेच्या डब्यांमध्ये खराब कांदा भरला जात असतानाचे चित्रिकरण असून एनसीसीएफचे नाशिक कार्यालयातील अधिकारीही येथे उपस्थित असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या या पोलखोलीमुळे नाफेड आणि एनसीसीएफचा घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
खुल्या बाजारातून कमी किमतीत कांदा खरेदी करायचा, भाव वाढले की निर्यात करायचा किंवा परत खुल्या बाजारात विकून दुप्पट तिप्पट नफा कमवायचा, त्यानंतर नाफेड आणि एनसीसीएफची खरेदी सुरू झाली की कागदोपत्री शेतकरी दाखवून याच कांद्याचे सरकारी पैसे वसूल करायचे आणि जेव्हा नाफेड आणि एनसीसीएफ ग्राहकांसाठी कांदा परत मागेल, तेव्हा मात्र बाजारातून कमी भावात सडका किंवा घाणेरडा कांदा विकत घेऊन त्यांना परत करायचा... नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा घोटाळ्याचे हे सूत्र असल्याचा आरोप अनेक शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी केला होता. कसबे सुकेणे येथे आज दिनांक १६ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन दरम्यान कांदा घोटाळ्याचा हा पॅटर्न वास्तवात असल्याचे सिद्ध होताना दिसत आहे.
येवला येथील कांदा उत्पादक शेतकरी गोरख संत हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत आज कसबे सुकेणे येथील रेल्वेच्या मालधक्क्यावर गेले होते. तेथे त्यांना सुमारे २५ ट्रकमधून रेल्वे वॅगनमध्ये कांदा भरला जाताना दिसत होता. या कांद्याच्या गोण्या सुमारे ४५ किलो वजनाच्या होत्या. त्यातील गोण्यात त्यांनी उलगडून पाहिल्या असता, त्यात सडलेला, पिचलेला,ओला झालेला कांदा दिसून आला. प्रवासादरम्यान हा कांदा आणखी खराब होण्याची भीती असून हे वॅगन दिल्लीकडे रवाना होत असल्याची माहिती श्री. संत यांना मिळाली.
या ठिकाणी शर्मा नावाचे एनसीसीएफचे अधिकारी उपस्थित होते, याशिवाय आणखीही अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते, मात्र त्यांना विचारणा केल्यावर त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला, इतकंच नव्हे, तर शेतकऱ्यांचीच तक्रार करण्याची धमकी दिल्याचेही व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान हा कांदा सुमारे १६५० मे. टन आणि सुमारे ५ ते ६ कोटी मूल्याचा असल्याचे सूत्रांनी सांगितले, तो दिल्लीसह उत्तरेकडच्या बाजारात जाणार आहे.
नाफेड आणि एनसीसीएफ या संस्थांच्या माध्यमातून खरेदी होत असलेल्या कांद्याच्या व्यवहारात कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप शेतकरी आणि काही राजकीय पक्ष करत आले आहेत. त्यासंदर्भात चौकशी करण्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालय, सीबीआय, इडी यांना पत्रही देण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर सुमारे पाच वेळा चौकशी समित्या नाशिकमध्ये येऊन गेलेल्या आहेत. मात्र याबाबत पुढे काहीच घडताना दिसत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
नाफेड आणि एनसीसीएफला जर कांदा विकायचा असेल, त्यासाठी अनेक निकष कागदोपत्री तरी या संस्थांनी ठेवलेले दिसतात. मात्र आज शेतकऱ्यांनी केलेल्या व्हिडिओ पोलखोलीनुसार हे कांदे खराब, लहान-मोठे आकाराचे असल्याने हे निकष नाफेड आणि एनसीसीएफ यांनीच पायदळी तुडवले असावे किंवा घोटाळा केलेला कांदा सरकारला परत देण्याची वेळ आल्यावर ऐनवेळेला सडका, हलका कांदा बाजारातून अत्यंत कमी किंमतीला विकत घेऊन परत देण्याचा भ्रष्ट अधिकारी, यंत्रणा आणि यात गुंतलेल्या भ्रष्ट शेतकरी उत्पादक कंपन्यांचा हेतू असावा, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान शेतकरी नेते निवृत्ती न्याहारकर म्हणाले की हा खराब कांदा दिल्ली किंवा उत्तरेकडच्या बाजारपेठेत कमी किंमतीत विकला जाईल. त्याचा परिणाम तेथील बाजारभाव पडण्यावर होतील, त्याचे अप्रत्यक्ष परिणाम नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांकडील कांद्याला कमी भाव मिळण्यावर होऊ शकतात.
वाहतूक आणि हाताळणी खर्च वजा केला, तर दि्ल्लीतील आजादपूर मंडीतील कांदा बाजारभावांपेक्षा नाशिकमधील बाजारसमित्यांमधील कांदा बाजारभाव सुमारे ६ ते ७ रुपयांनी कमी असल्याचे व्यापारी सांगतात. जर खराब कांदा दिल्लीत विकला आणि तेथील भाव पडले, तर त्यामुळे नाशिकच्या कांद्याला सध्या सरासरी ४० रुपये मिळणारा बाजारभाव कमी होण्याची भितीही शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.
नाफेड, एनसीसीएफला कुठल्या दर्जाचा कांदा लागतो?
1. भगवा कांदा, म्हणजेच उन्हाळ कांद्याची खरेदी केली जाते, जेणे करून तो साठवता येईल.
2. कांद्याचा रंग खूप उडालेला नको.
3. डबल पत्तीचा किंवा आवरणाचा कांदा हवा
4. डाग पडलेला, आवरण किंवा पत्ती निघालेला, तोंडाच्या बाजूला बोट पूर्ण जाईल अशी पोकळी असलेला कांदा खरेदी केला जात नाही.
5. कांद्याचा विशिष्ट आकार असावा, साधारणत: 45 ते 60 मि.मी. व्यासाचा.
6. कांद्याला कोजळी (काजळी) आलेली नसावी.
7. त्यात ओलाव्याचे प्रमाण खूप नसावे.
अशी होते कांदा खरेदी प्रक्रिया :
1.नाफेडची कांदा खरेदी शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत होते. या कंपन्या शेतक ºयांचे आणि नाफेडचे प्रतिनिधी म्हणून काम करतात.
2. खरेदीसाठी या कंपन्यांकडे कांदा साठवणुकीच्या विशिष्ट क्षमतेच्या गोडाऊनची अट असते.
3. शेतकरी कंपन्यांना खरेदी केलेला कांदा सांभाळण्यासाठी नाफेड विशिष्ट शुल्क अदा करते.
4. खरेदी केलेला कांदा शेतकरी कंपन्या आपल्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवतात. व सरकारच्या आवश्यकतेप्रमाणे नाफेडच्या निर्देशानुसार कांदा बाजारात येतो.
5. साठवणुकीदरम्यान सुमारे 18 टक्के कांदा हवामान, हाताळणी वगैरे बाबींमुळे खराब झाला, तर ते गृहीत धरण्यात येते. मात्र त्यापेक्षा जास्त कांदा खराब झाला, व अपेक्षित प्रमाणात कांदा नाफेडला परत दिला नाही, तर नाफेड संबंधित शेतकरी उत्पादक कंपनीकडून खरेदी दराच्या पाचपट वसुली करते. किमतीच्या आतापर्यंत काही कंपन्यांना असा जबर दंड भरावा लागला व त्यातून शेतकººयांच्या कंपन्यांसह त्यांचे सभासद असलेल्या शेतकºयांचेही मोठे नुकसान झाले.
6. या अनुभवातून शहाणे होऊन चार ते पाच महिने साठवता येईल अशाच दर्जाचा कांदा शेतकरी कंपन्या खरेदी करतात.